बेळगाव लाईव्ह : तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी न्यायालयाने काल गुरुवारी अटकपूर्व जामीन मंजूर केल्यामुळे तहसीलदार बसवराज नागराळ आज शुक्रवारपासून पूर्ववत आपल्या कामावर रुजू झाले आहेत.
बेळगाव तहसीलदार कार्यालयातील एसडीए रुद्राण्णा यडवण्णावर (वय 34) या अधिकाऱ्याने गेल्या 5 नोव्हेंबर रोजी सकाळी तहसीलदार कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
रुद्राण्णा यांनी आत्महत्या करण्यापूर्वी ‘तहसीलदार ऑफिस ऑल स्टाफ’ या व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज करून आपल्या मृत्यूला तहसीलदार बसवराज नागराज, सोमू व अशोक कब्बलीगेर हे तिघेजण जबाबदार असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यामुळे खडेबाजार पोलीस ठाण्यात तहसीलदारांसह तिघाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्येच्या घटनेनंतर संशयित तहसीलदार व अन्य दोघेजण फरारी झाले होते. मात्र आता काल गुरुवारी बेळगाव दहाव्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने तीनही संशयीतांना अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
या पद्धतीने जामीन मंजूर होताच तहसीलदार बसवराज नागराळ यांनी आज शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे आपल्या कार्यालयात दाखल होऊन कामकाजाला सुरुवात केली आहे. तथापि तहसीलदार कार्यालयातील त्यांची उपस्थिती परिसरात चर्चेचा विषय झाली होती.