बेळगाव लाईव्ह :भूखंड घोटाळ्यावरून मुख्यमंत्र्यांना कोणत्याही क्षणी राजीनामा द्यावा लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली असताना बेळगाव जिल्ह्यामध्ये राज्यातील सर्वात मोठा जमीन घोटाळा झाल्याचा खळबळजनक आरोप माहिती हक्क कार्यकर्ता भीमाप्पा गडाद यांनी केला असून कांही प्रभावशाली राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने सरकारी नियमांची पायमल्ली करत भूमाफीयांकडून तब्बल 762 एकर 20 गुंठे सरकारी जमीन घशात घालण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
शहरातील कन्नड साहित्य भवन येथे काल बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. सरकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून कांही प्रभावशाली राजकीय व्यक्ती व भूमाफियांनी जिल्ह्यातील 762 एकर 20 गुंठे सरकारी जमीन हडप केली असे सांगून प्रकरणामागे मंत्र्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप गडाद यांनी पुढे केला.
देवणकट्टी (ता. रायबाग) गावाच्या व्याप्तीतील सर्व्हे नं. 59 मधील 152 एकर 20 गुंठे व सर्व्हे नं. 79 मधील 101 एकर 20 गुंठे अशी एकूण 254 एकर सरकारी जमीन अधिकारी व राजकीय व्यक्तींच्या आशीर्वादाने भूमाफीयांच्या नावे करण्यात आली आहे.
ही जमीन डोंगराळ प्रदेश म्हणून नोंद होती जी आता मालकी झाली आहे. त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील जांबोटी गावाजवळील हुळंद येथील सर्व्हे नं. 03 मधील 508 एकर 20 गुंठे जमीन सातबारा उताऱ्यामधील स्तंभ क्रमांक 11 आणि 2 मध्ये ‘गावातील सर्व लोकांची’ अशी नोंद आहे.
ही जमीन हुळंद गावातील प्रत्येकाची मालमत्ता असल्याचे वडीलधाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र असे असतानाही सरकारी अधिकाऱ्यांकडून ग्रामस्थांची असणारी नोंद कमी करण्याचा आदेश जारी करण्यात आला असल्याची माहितीही भीमाप्पा गडाद यांनी दिली.