Sunday, December 22, 2024

/

बेळगावचे ज्युडोपटू, प्रशिक्षक करणार भारताचे प्रतिनिधित्व

 belgaum

बेळगाव लाईव्ह:डीवायईएस ज्युडो प्रशिक्षण केंद्र बेळगावच्या दोन ज्युडोका कु. साईश्वरी कोडचवाडकर आणि भूमिका व्ही. एन. यांच्या सोबत एनआयएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील यांनी चीनमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई खुल्या ज्युडो अजिंक्यपद स्पर्धा -2024 मध्ये आपल्या देशाचे, भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा सन्मान प्राप्त केला आहे.

हाँगकाँग, चीन येथे येत्या दि. 8 ते दि. 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत आशियाई खुली ज्युडो अजिंक्यपद स्पर्धा -2024 होणार आहे. या स्पर्धेत आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगावच्या दोन होतकरू ज्युडो खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा थोडक्यात परिचय पुढीलप्रमाणे आहे.

चीनमधील स्पर्धेसाठी निवड झालेल्या साईश्वरी कोडचवाडकर हिने गेल्या महिन्यात कझाकस्तानच्या आशियाई खुल्या ज्युडो चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. तसेच केरळ मध्ये झालेल्या दक्षिण विभागीय महिला राष्ट्रीय साखळी ज्युडो स्पर्धा -2023 मध्ये तिने रौप्य पदक आणि बळ्ळारी, कर्नाटक येथील कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिप -2023 स्पर्धेत कांस्यपदक मिळवले आहे.

ज्युडो फेडरेशन ऑफ इंडियाने गेल्या मार्च 2024 मध्ये खुल्या आंतरराष्ट्रीय निवड चांचणीचे आयोजन केले होते त्यामध्ये साईश्वरी हिने पहिल्या चार अव्वल खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. त्या आधारे आता तिची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

साईश्वरी ही बेळगाव जिल्हा क्रीडा उपसंचालक श्रीनिवास बी. यांच्या सहकार्याने बेळगाव जिल्हा क्रीडांगण येथील ज्युडो प्रशिक्षण केंद्रामध्ये ज्युदो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे.

भूमिका व्ही. एन. बेळगावच्या डीवायईएस ज्युडो केंद्राची सदस्य असून सध्या ती जेएसडब्ल्यू आयआयएस बळ्ळारी येथे सराव करत आहे. तिने गेल्या महिन्यात कझाकस्तानच्या आशियाई खुल्या ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये भाग घेतला होता.

तसेच ती केरळमध्ये झालेल्या राष्ट्रीय महिला लीग सुवर्ण पदक आणि दिल्ली मधील वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय ज्युडो स्पर्धेतील रौप्य पदक विजेती आहे. भूमिका व्ही. एन. ही देखील अव्वल चार मानांकनांमध्ये आहे. त्या आधारावर ती चीन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरली आहे.Judo

चीनमधील स्पर्धेसाठी बेळगावच्या मातब्बर माजी ज्युडो खेळाडू आणि एनआयएस ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील यांची भारतीय महिला ज्युडो संघ प्रशिक्षक म्हणून अभिमानास्पद निवड झाली आहे. रोहिणी पाटील कर्नाटक सरकारच्या बेळगाव जिल्हा युवा सक्षमीकरण आणि क्रीडा विभागात (डीवायईएस) क्रीडा प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. रोहिणी यांनी आजतागायत अनेक राज्य आणि राष्ट्रीय पदक विजेते ज्युडो खेळाडू तयार केले आहेत.

आशियाई खुल्या ज्युडो अजिंक्यपद स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनकडे रवाना होणाऱ्या भारतीय संघात 9 खेळाडू, 2 प्रशिक्षक आणि 2 पंच यांचा समावेश असणार आहे. हा भारतीय ज्युडो संघ दि. 7 नोव्हेंबर 2024 रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून चीनकडे प्रयाण करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.