बेळगाव लाईव्ह :गेल्या जवळपास 3 वर्षापासून संथ गतीने सुरू असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतरण प्रक्रियेला आता गती येण्याची चिन्हे दिसू लागली असून हस्तांतरणाबाबत महत्त्वाची बैठक येत्या 3 डिसेंबर 2024 रोजी ऑनलाईन आयोजित करण्यात आली आहे.
या आधी चार महिन्यांपूर्वी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डमध्ये हस्तांतरणासंबंधित बैठक झाली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह विविध राज्यांतील निवडणुकांमुळे बैठक होऊ शकली नव्हती.
मात्र आता बैठकीचे नियोजन करण्यात आले असून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतरण संदर्भातील या ऑनलाइन बैठकीस पुणे येथील सदर्न कमांडचे अधिकारी, बेंगलोर व दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयाचे अधिकारी, बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि सीईओ राजीव कुमार उपस्थित राहणार आहेत.
याआधी देशातील कांही मोजक्याच कॅन्टोन्मेंट बोर्डाने हस्तांतरणासंबंधीची पत्रे गेली होती. त्या अनुषंगाने प्रक्रियाही सुरू होती. मात्र यावेळी देशातील बहुतांश कॅन्टोन्मेंट बोर्डांना पत्र पाठवून हस्तांतरणासंबंधी बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक वेगवेगळ्या तारखाना बैठकी होणार आहेत.
गेल्या तीन वर्षापासून कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हस्तांतरणासंबंधी प्रक्रिया कांही कारणास्तव संथ गतीने सुरू होती. गेल्या फेब्रुवारीपासून या प्रक्रियेला गती आली होती. मात्र लोकसभा निवडणूक, त्यानंतर महाराष्ट्र व इतर विधानसभा निवडणुकीमुळे ही प्रक्रिया पुन्हा रखडली होती. तथापि आता येत्या 3 डिसेंबरला 2024 ला ऑनलाइन बैठकीचे नियोजन केले असल्यामुळे हस्तांतरणाला गती येण्याची शक्यता आहे.