बेळगाव लाईव्ह :बेळगाव शहरात बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स या नावाची नवी संघटना स्थापन करण्यात आली असून या संघटनेचा उद्घाटन समारंभ येत्या बुधवार दि. 6 नोव्हेंबर 2024 रोजी 4 वाजता ओरिएंटल इंग्लिश मीडियम हायस्कूल शेजारील श्री संत तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष उद्योजक महेश सातपुते यांनी दिली.
शहरामध्ये आज सोमवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. आपल्या नव्या संघटनेचे ध्येय युवा पिढीला संघटित करून बंधुता, एकता आणि सहकार्य वाढवणे. शरीर सौष्ठव स्पर्धा व उपक्रमांचे आयोजन, शरीर सौष्ठवपटुंना वैज्ञानिक शिक्षण देणे, त्याला सुसज्ज व्यायाम शाळा उपलब्ध करणे तसेच होतकरू शरीर सौष्ठवपटुंना राज्य राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे असणार असल्याचे सातपुते यांनी पुढे सांगितले.
तसेच संघटनेच्या कार्यकारणीतील सदस्यांची माहिती देऊन अध्यक्ष महेश सातपुते यांनी बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स ही संघटना समाजात तंदुरुस्ती, आरोग्य आणि क्रीडा उत्कृष्टतेचा प्रचार करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. तसेच आपली संघटना इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनची संलग्न असून इंडियन ऑलंपिक असोसिएशनकडून मान्यता प्राप्त असल्याचे त्यांनी सांगितले.
बेळगाव डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डर्स असोसिएशन अँड स्पोर्ट्स संघटनेची (बीडीबीबीए अँड एस) कार्यकारिणी पुढील प्रमाणे आहे. अध्यक्ष -महेश सातपुते, उपाध्यक्ष -सुनील एच. चौधरी (माजी राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू) व बाबू एम. पावशे (माजी राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू) खजिनदार -नारायण एम. चौगुले (माजी शरीर सौष्ठवपटू), सरचिटणीस -राजेश जी. लोहार (राष्ट्रीय पंच व माजी राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू), सहाय्यक चिटणीस -डॉ अमित एस. जडे (राष्ट्रीय पंच माजी व राष्ट्रीय शरीर सौष्ठवपटू), संयोजक सचिव -अनिल जी. अंबरोळी (संस्थापक व राष्ट्रीय पंच),
सहाय्यक सचिव -जितेंद्र बी. काकतीकर (शिहान व राष्ट्रीय पंच), तांत्रिक संचालक -भरत पी. बाळेकुंद्री, सुनील एम. बोकडे, प्रेमकांत एस. पाटील, चेतन पी. ताशिलदार, विजय चौगुले, विनोद मेत्री व सिद्धार्थराजे सावंत. पत्रकार परिषदेस संघटनेचे संस्थापक अनिल अंबरोळी, डॉ. अमित जडे, सुनील चौधरी, बाबू पावशे, नारायण चौगुले आदींसह अन्य पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.