बेळगाव लाईव्ह : शुक्रवारी रात्री काही अज्ञातांनी पेट्रोल भरलेल्या बियरच्या बाटल्या फेकून कलखांब ग्रामपंचायत कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना आज (शनिवारी) सकाळी उघडकीस आली. यामुळे ग्रामपंचायतीच्या इमारतीचे नुकसान झाले असून सदर प्रकार कलखांब परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
बेळगाव तालुक्यातील कलखांब ग्रामपंचायत कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न अज्ञातांनी केल्याचे आज शनिवारी सकाळी उघडकीस आले. काल शुक्रवारी रात्री ग्रामपंचायत कार्यालय पेटवून देण्यासाठी हल्लेखोरांनी पेट्रोल भरलेल्या बियर बाटल्यांचा वापर केल्याचे निदर्शनास आले आहे.
पेट्रोल बॉम्ब प्रमाणे वापरण्यात आलेल्या या बाटल्या ग्रामपंचायत इमारतीच्या दर्शनीय भागावर फेकण्यात आल्या. त्यामुळे इमारतीने पेट घेतला नसला तरी काही भाग जळीत होण्याबरोबरच खिडक्यांची तावदाने फुटून नुकसान झाले आहे.
सदर प्रकार नेहमीप्रमाणे आज शनिवारी सकाळी कार्यालयाकडे आलेल्या ग्रामपंचायतीचे कर्मचारी व पदाधिकारी यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तात्काळ घटनेची माहिती पोलिसांना दिली. तेंव्हा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
घटनास्थळी ग्रामपंचायत पदाधिकारी व स्थानिकांकडून प्राथमिक माहिती जाणून घेतल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचे शोधकार्य हाती घेतले आहे. दरम्यान, चक्क ग्रामपंचायत कार्यालयात पेटवून देण्याच्या प्रयत्नामुळे कलखांब गावात खळबळ उडाली असून या घटनेच्या बाबतीत तर्कवितर्क केले जात आहेत.
या भागात काल एका लोकप्रतिनिधीचा दौरा आखण्यात आला होता वेळेच्या कमतरतेमुळे एका समुदायाच्या गल्लीतील विकासकामांच्या भूमिपूजनासाठी ते लोकप्रतिनिधी उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी नियोजित ठिकाणी त्यांच्या आगमनाची, स्वागताची आणि भूमिपूजनासाठी आवश्यक ती सर्व तयारी करून ठेवण्यात आली होती. यामुळे संतापलेल्या गटाने संतापाच्या भरात ग्रामपंचायत कार्यालयाची तोडफोड केल्याची आहे का ? याची चर्चा गावात सुरु आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास घेत असून संबंधितांवर कारवाई केली जाईल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.