बेळगाव लाईव्ह :ऑटो रिक्षातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे रिक्षाचालकाशी भांडण होऊन त्याचे पर्यवसान रिक्षाचालकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यामध्ये झाल्याची घटना काल सोमवारी रात्री बेळगाव शहरात घडली. हल्ल्यात ऑटोरिक्षा चालक गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.
रियाज तहसीलदार (वय 53) असे गंभीर जखमी झालेल्या ऑटो रिक्षा चालकाचे नांव आहे. बेळगाव बस स्थानकावरून रियाज आपल्या ऑटो रिक्षातून एका प्रवाशाला अलारवाड क्रॉस येथे घेऊन जात होता.
त्यावेळी वाटेत दोघांच्यामध्ये भांडण झाले. या भांडणाचे पर्यवसान मारुतीनगर येथील एससी मोटारनजीक प्रवाशाने ऑटो रिक्षा चालक रियाज याच्यावर चाकूने हल्ला करण्यामध्ये झाले. या हल्ल्यात गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झालेला रियाज आपली रिक्षा घेऊन कसाबसा पुन्हा बेळगाव बस स्थानकापर्यंत आला.
त्याठिकाणी रिक्षा स्टॅन्डवरील त्याच्या सहकारी रिक्षाचालकांनी त्याला उपचारासाठी तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. सध्या रियाज तहसीलदार याच्यावर केएलई हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. खुनी हल्ला झालेला रियाज हा बेळगाव तालुक्यातील मूळचा उचगाव येथील रहिवासी आहे. तो भाड्याने ऑटो रिक्षा चालवत होता.
गांजाचा विषय निघाल्याने त्यातून भांडणाला सुरुवात होऊन त्या प्रवाशाने रियाजवर खुनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचा तसेच रियाजकडील पैसे लुबाडल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. सध्या जीवन -मरणाच्या उंबरठ्यावर असलेल्या रियाज तहसीलदार याला वाचवण्याचे प्रयत्न केएलई हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत.
याप्रकरणी माळमारुती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान ऑटो चालकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांनी दिली आहे.