बेळगाव लाईव्ह : तामिळनाडूतील होसुर न्यायालयाच्या आवारात ॲड. कन्नन या वकिलाचा चाकूने भोसकून खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला कठोर शासन करण्याची विनंती कर्नाटक सरकारने तामिळनाडू सरकारला करावी.
या खुनी हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून वकिलांवरील वाढते हल्ले लक्षात घेता सरकारने राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणावा, अशी मागणी बेळगाव वकील संघटनेने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे केली आहे.
बेळगाव बार असोसिएशन अर्थात बेळगाव वकील संघटनेतर्फे आज गुरुवारी सकाळी निदर्शने करत मोर्चाने उपरोक्त मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांकडे धाडण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून ते त्वरित मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्याचे आश्वासन दिले. तामिळनाडूच्या कृष्णगिरी जिल्ह्यातील होसुर न्यायालय आवारामध्ये वकील ॲड. कन्नन हे न्यायालयातून बाहेर पडत असताना त्यांच्यावर जो खुनी हल्ला करण्यात आला त्याचा बेळगाव वकील संघटना तीव्र निषेध करते.
तसेच होसूर न्यायालय आवारात ॲड. कन्नन यांना चाकूने भोसकणारा आरोपी आनंद याच्यावर तामिळनाडू सरकारने कठोर कारवाई करावी अशी विनंती कर्नाटक सरकारने तामिळनाडू सरकारला करावी. वकील बंधू सेवाभिमुख बंधुत्व निर्माण करत असतात. अशा वकिलांवर ग्राहकांचे प्रतिनिधीत्व केल्याबद्दल हल्ले केले जातात हे घृणास्पद कृत्ये असून निषेधार्ह आहे. वकील बांधवांची सुरक्षा सर्वतोपरी महत्त्वाची असून अति प्राधान्याने पुरवली गेली पाहिजे.
बेळगाव वकील संघटना एकजुटीने गंभीर जखमी ॲड. कन्नन यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी उभी आहे. कर्नाटक सरकारनेही तामिळनाडू सरकारला विनंती करून हल्लेखोर आनंद याच्यावर कठोर कारवाई करण्याची विनंती करण्याद्वारे ॲड. कन्नन यांना न्याय मिळवून द्यावा. त्याचप्रमाणे वकिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात वकील संरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी केली जावी, अशा आशयाचा तपशील मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना धाडण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे.
आपल्या मागणी संदर्भात प्रसिद्धी माध्यमांसमोर बोलताना वकील संघटनेचे नेते म्हणाले की, तामिळनाडू येथील होसुर न्यायालय आवारामध्ये काल वकिलावर जो प्राणघातक हल्ला झाला त्याचा आम्ही बेळगाव वकील संघटनेतर्फे तीव्र निषेध करतो कोणताही वाद मिटवण्यासाठी न्यायालय आहे कायदा आहे त्याऐवजी आपली सेवा बजावणाऱ्या वकिलावर वकिलावर न्यायालय आवारात राजरोस खुनी हल्ला केला जातो तो देखील पोलीस ठाणे जवळ असताना ही बाब गंभीर असून आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करतो या संदर्भात आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन धाडले असून भर न्यायालय आवारात अथवा अन्य ठिकाणी वकिलांवर वारंवार होणाऱ्या हल्ल्यांना आळा घालावा अशी मागणी केली आहे
तसेच कर्नाटक सरकारने तामिळनाडू सरकारला विनंती करून वकिलावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यास सांगावे त्याचप्रमाणे वकील संरक्षण कायदा अंमलात आणून आपल्या राज्यातील न्यायालय आवारांमध्ये वकिलांना संरक्षण पुरवावे अशी विनंतीही बेळगाव वकील संघटनेतर्फे सरकारला करण्यात आली आहे, अशी माहिती वकिलांनी दिली. याप्रसंगी बहुसंख्य वकील उपस्थित होते.