बेळगाव लाईव्ह:आपटेकर स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे अलीकडेच घेण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यती मधील होतकरू धावपटूंना आवश्यक व्यायामाचे साहित्य देणगी दाखल देण्याचा कार्यक्रम आज बुधवारी सकाळी उत्साहात पार पडला.
उचगाव येथील शंकर -पार्वती मंगल कार्यालयामध्ये आज बुधवारी उपरोक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मिस्टर इंडिया सुनील आपटेकर, डॉ. रवी पाटील व एसएसएस फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संजय सुंठकर, नेते विलास पवार यांच्या हस्ते गरजू क्रीडापटूंकडे व्यायामाचे साहित्य सुपूर्द करण्यात आले. कार्यक्रमास अमर आपटेकर, पी. युवराज, सुरेश जाधव, प्रतीक आपटेकर आदींसह हितचिंतक आणि बरेच क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना रेल्वे अधिकारी मिस्टर इंडिया सुनील आपटेकर म्हणाले, बेळगाव शहर परिसरातून ऑलम्पिक दर्जाचा एक तरी दर्जेदार क्रीडापटू घडविणे हे माझे स्वप्न आहे. त्या अनुषंगाने आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे नुकत्याच घेण्यात आलेल्या मॅरेथॉन शर्यती मधील होतकरू क्रीडापटूंना मी आज व्यायामाचे साहित्य देणगी दाखल देत आहे.
त्या देणगीसाठी मला क्रीडाप्रेमी डॉ. रवी पाटील आणि संजय सुंठकर त्यांचे सहकार्य लाभले आहे. व्यायाम केला तरच क्रीडापटू सुदृढ राहून स्पर्धेत उत्तम कामगिरी बजावू शकतील. आपल्या भागातील होतकरू क्रीडापटूंना आवश्यक सुविधा आणि कौशल्य सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध झाले पाहिजे.
यासाठी आपटेकर स्पोर्ट्स फाऊंडेशन सतत प्रयत्नशील राहणार आहे असे सांगून सुनील आपटेकर यांनी उपस्थित क्रीडापटूंना सुयश चिंतून शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ. रवी पाटील यांनी देखील उपस्थित क्रीडापटूंसमोर मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.