Wednesday, January 22, 2025

/

व्यसनमुक्त करण्यासाठी असाही होतोय प्रयत्न

 belgaum

बेळगाव  लाईव्ह :बेळगाव शहराला गांजाच्या विषारी विळख्यातून मुक्त करण्याचा विडा बेळगाव शहरातील मुस्लिम समाजातील काही बांधवांनी घेतला आहे.यासाठी त्यांनी गांजा सेवन करणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याची मोहीम राबवली आहे.

शहरातील मुस्लिम समाज आणि युवकांनी गांजाचे सेवन करणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यास सुरुवात केली असून काल बुधवारी 9 जणांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या पद्धतीने मुस्लिम समाज आक्रमक झाल्यामुळे गांजा माफीयांचे धाबे दणाणले आहेत. पहिल्या टप्प्यात खंजर गल्ली परिसर जालगर गल्ली आणि दरबार गल्ली भागात ही मोहीम राबवण्यात आली आहे.

बेळगाव शहरातील गांजाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मुस्लिम समाजाच्या विविध संघटना, पंचमंडळी, नगरसेवक आणि युवकांनी अलीकडेच मार्केट पोलीस ठाण्याला घेराव घातला होता. तसेच शहरातील वाढत्या गांजा विक्रीला आळा घालण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेत मार्केट विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांनी (एसीपी) लवकरच शहरातील गांजा विक्री रोखण्याचे आश्वासन दिले होते. तसेच त्या अनुषंगाने कारवाईला देखील प्रारंभ केला आहे.

आता ही पोलीस कारवाई सुरू असतानाच दुसरीकडे मुस्लिम समाजातील युवक गांजाच्या विरुद्ध आक्रमक झाले आहेत. बेळगाव शहरातून गांजाचे समुळ उच्चाटन करण्याचा त्यांनी जणू विडाच उचलला आहे. यामुळे गांजा माफिया व विक्रेत्यांचे धाबे मात्र दणाणले आहेत. गांजाविरुद्धच्या मोहिमेसंदर्भात सामाजिक कार्यकर्ते व नगरसेवक मुजामील डोणी यांनी आज गुरुवारी बेळगाव लाईव्हला अधिक माहिती दिली.

नगरसेवक मुजामील डोणी यांनी सांगितले की, आम्ही शहरात जे कोण गांजाचे सेवन करत आहेत त्यांना शोधून पोलिसांच्या स्वाधीन करत आहोत. गांजाची विक्री करणारा सहसा सापडू शकत नसल्यामुळे त्याचे सेवन करणाऱ्यालाच पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्याची मोहीम आम्ही हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत आमच्या समाज बांधवांनी काल बुधवारी खंजर गल्ली परिसरातील जवळपास 16 जणांना पकडले.Ganja

त्यापैकी अट्टल नशाबाज 9 जणांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले तर उर्वरितांना चांगला दम भरून सोडून देण्यात आले. या खेरीज आझादनगर, न्यू गांधीनगर, उज्वलनगर, कसाई गल्ली, अझमनगर, गांधीनगर वगैरे सर्व ठिकाणी गांजाचे सेवन करणाऱ्यांना पकडण्याची मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेअंतर्गत गांजा पिणाऱ्यांना पकडून एक तर समज दिली जाईल किंवा त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाईल.

पोलीस देखील आमच्या या मोहिमेला सहकार्य करत असून गांजाचे सेवन करणाऱ्यांवर कारवाई करत आहेत असे सांगून त्याबद्दल आम्ही पोलिसांची देखील आभारी आहोत असे नगरसेवक डोणी म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.