बेळगाव लाईव्ह :बेळगावमध्ये होणाऱ्या आगामी विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेचे अध्यक्ष उद्या शुक्रवारी 18 ऑक्टोबर रोजी बेळगावात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी काल बुधवारी अधिकाऱ्यांची बैठक घेतली.
सदर बैठकीला जिल्ह्यातील महत्त्वाचे अधिकारी उपस्थित होते. दोन्ही अध्यक्षांच्या बैठकीवेळी कोणत्या विषयांवर चर्चा होऊ शकते? त्या बैठकीत कोणती माहिती द्यावी लागणार? याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी (डीसी) अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
विधिमंडळ अधिवेशन यंदाही डिसेंबर महिन्यातच होणार असले तरी त्याच काळात बेळगाव झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचा शताब्दी सोहळाही साजरा केला जाणार आहे. त्यामुळे यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसोबत काँग्रेसच्या अधिवेशनाच्या अनुषंगाने देखील जिल्हा प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या कार्यकाळातील हे पहिलेच विधिमंडळ अधिवेशन असल्यामुळे त्यांनी आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. सदर अधिवेशन काळात बेळगाव ज्या अधिकाऱ्यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली आहे त्यांच्याकडून माहितीचे संकलन केले जात आहे. अधिवेशन काळात निवास व्यवस्थेची जबाबदारी महापालिकेकडे दिली जाते.
त्यामुळे काल झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त अशोक दूडगुंटी यांनाही बोलावण्यात आले होते. बैठकीत विधानसभा अध्यक्ष यु. टी. खादर व विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी यांच्या बेळगाव दौऱ्याबाबत चर्चा करून आवश्यक ती पूर्वतयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.