बेळगाव लाईव्ह :खानापूर रोड ते टिळकवाडी दुसरे रेल्वे गेटला जोडणाऱ्या रस्त्यावरील स्वयंभू श्री गणेश मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याशेजारी असलेल्या खुल्या जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू असून हे बांधकाम तात्काळ थांबून हटवण्यात यावे अशी मागणी अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्यासह परिसरातील लोकांनी महापालिका आयुक्तांकडे केली आहे.
अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली उपरोक्त मागणीचे निवेदन आज शुक्रवारी सकाळी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना सादर करण्यात आले.
खानापूर रोड ते टिळकवाडी दुसरे रेल्वे गेटला जोडणाऱ्या रस्त्यावरील स्वयंभू श्री गणेश मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याशेजारी असलेल्या खुल्या जागेत बेकायदेशीर बांधकाम सुरू असून कॉलमही घालून झाले आहेत. शहर विकास आराखड्यानुसार (सीडीपी) हा रस्ता 60 फूट रुंदीचा असला तरी सध्या तो खूपच अरुंद आहे.
टिळकवाडी पहिले रेल्वे गेट येथे काँग्रेस रोडवर बॅरिकेड्स टाकले असल्यामुळे गोडसेवाडी किंवा मिलिटरी महादेव मंदिराच्या दिशेने जाणे शक्य नसल्याने काँग्रेस रोडवर जाण्यासाठी नागरिक सर्रास या रस्त्याचा वापर करतात. त्यामुळे सदर रस्त्यावर बांधकामे होत राहिल्यास या रस्त्याचा वापर करणे लोकांना कठीण जाईल किंवा त्यांना तिसऱ्या रेल्वे गेट मार्गे जवळपास 1.5 ते 2 कि.मी. अंतराचा भोवाडा मारून काँग्रेस रोडवर यावे लागेल. एखाद्या ठिकाणी खोली जागा उपलब्ध असेल तर महापालिका त्याचा पी पार्किंगसाठी वापर करू शकते. मिळालेल्या माहितीनुसार महापालिकेकडूनच स्वयंभू श्री गणेश मंदिरा मागील जागेत बांधकाम केले जात आहे. महापालिकेचे अनेक दुकान गाळे रिकामी पडून असताना अशा पद्धतीने रस्त्याला लागून बांधकाम करण्यास काय अर्थ आहे?
महापालिका जर असे करत असेल तर जनता देखील रस्त्यावर अतिक्रमण करणारच. सर्वसामान्य नागरिक बांधकाम परवान्यासाठी महापालिकेकडे गेल्यास ही कागदपत्रे द्या, ती कागदपत्रे द्या अशी मागणी करून महापालिका अधिकारी परवानात देण्यास विलंब करतात हे सर्वश्रुत आहे.
मात्र एखादे अनधिकृत बांधकाम सुरू असेल तर मात्र महापालिका कोणतीच कारवाई करत नाही. तेंव्हा आपल्याला विनंती आहे की खानापूर रोड ते टिळकवाडी दुसरे रेल्वे गेटला जोडणाऱ्या रस्त्यावरील स्वयंभू श्री गणेश मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याशेजारी सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबून लवकरात लवकर हटविण्यात यावे, अशा आशयाचा तपशील माजी नगरसेवक गुंजटकर यांनी महापालिका आयुक्तांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे.
या निवेदनावर आर. एम. बोकडे, भावेश ताशिलदार, अजित चौगुले, अजय सातेरी, अजित हंगिरगेकर, एन. ए. अमरोळकर, नागेश साळवे, शिवाजी पाटील, ए. एस. देसाई आदी बहुसंख्य नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.