बेळगाव लाईव्ह:पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग तसेच बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गाच्या ठिकठिकाणच्या रस्त्यांचे काम अद्याप सुरू असल्यामुळे ते काम पूर्ण होईपर्यंत सदर महामार्गांवरील टोल वसुली थांबवण्यात यावी, अशी विनंती बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी आज शनिवारी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग खात्याचे मंत्री नितीन गडकरी यांना एका पत्राद्वारे केली आहे.
पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील बेळगाव -संकेश्वर -कोल्हापूर -कराड या दरम्यान सुरू असलेले रस्ता रुंदीकरणाचे काम सर्वश्रुत आहे. बेळगाव ते कराड दरम्यानचा मार्गावर सर्वात व्यस्त रहदारी असते. तथापि सध्या सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असून परिणामी अतिशय संथ गतीने होणाऱ्या वाहतुकीमुळे वाहनचालक व प्रवाशांना घुसमटणाच्या अनुभवाला सामोरे जावे लागत आहे.
त्याचप्रमाणे वाहनचालक व प्रवाशांचा वेळेचा अपव्यय देखील होत असून इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी त्यांना निर्धारित वेळेच्या दुप्पट वेळ लागत आहे. याव्यतिरिक्त रस्त्याच्या खराब परिस्थितीमुळे वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माझ्या लोकसभा मतदारसंघातील बेळगाव कर्नाटकातील प्रवासी रहिवाशांनी अनेकदा बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी प्लाझा येथे टोल भरण्यास विरोध केला आहे. असाच प्रकार रस्त्याचे नूतनीकरणाचे काम सुरू असल्यामुळे आणि खराब रस्त्यामुळे बेळगाव जिल्ह्याच्या खानापूर तालुक्यातील बेळगाव -पणजी राष्ट्रीय महामार्गावर घडला आहे.
रस्त्याचे विकास काम आणि खराब रस्त्यामुळे वाहनचालक प्रवाशांना प्रचंड त्रास, मनस्ताप होत असताना देखील या मार्गावरील गणेबैल टोल प्लाझाच्या ठिकाणी सक्तीने टोल वसूल केला जात असल्याच्या वाढत्या तक्रारी आहेत.
एकंदर रस्त्यांची सुधारणा होईपर्यंत टोल वसुलीची संकल्पना थांबवण्यात यावी अशी जनतेची एकमुखी मागणी आहे. सदर महामार्गांच्या विकास कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी पासूनच टोल वसुली केली जात असल्याचाही आरोप आहे.
येथे नमूद करणे आवश्यक असलेली काही कामे म्हणजे रामनगर ते होनकल क्रॉस, खानापूर मराठा मंडळ ते करंबळ क्रॉस आणि हत्तरगुंजी क्रॉस ते गणेबैल टोल प्लाझापर्यंतचा सर्व्हिस रोड या रस्त्यांची कामे अद्याप पूर्ण व्हावयाची आहेत.
होणकल ते हलगा बायपास रस्त्याचे काम देखील अद्याप सुरूच आहे. तेंव्हा या रस्त्यांचा वेळोवेळी वापर करणाऱ्या माझ्या मतदार संघातील जनतेच्या वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मी आपल्याला वैयक्तिकरित्या विनंती करतो की जनतेची मागणी लक्षात घेऊन संबंधित मार्गांवरील टोल वसुली रस्त्यांची कामे पूर्ण होईस्तोपर्यंत थांबविण्यात यावी, अशा आशयाचा तपशील खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आज शनिवारी धाडलेल्या पत्रात नमूद आहे.