बेळगाव लाईव्ह : तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या शांतिनिकेतन पदवीपूर्व महाविद्यालयाच्या प्रांगणात १५ आणि १६ ऑक्टोबर असे दोन दिवस पूर्व पदवीधर महाविद्यालयांच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पूर्व पदवीपूर्व शिक्षण विभागाचे उपसंचालक एम.एम.कांबळे यांनी दिली.
रविवारी शांतिनिकेतन महाविद्यालयात स्पर्धेच्या तयारीची पाहणी केल्यानंतर त्यांनी सभागृहात आयोजित सभेत ते बोलत होते. जिल्हास्तरीय स्पर्धा जिंकून राज्यस्तरासाठी निवड झालेल्या राज्यातील 32 जिल्ह्यातील 940 हून अधिक कुस्तीपटू या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. जिल्हानिहाय संघ 14 रोजी सोमवारी सायंकाळी शांतीनिकेतन महाविद्यालयात अहवाल देतील. पालक मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते 15 रोजी सकाळी 10 वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, मधु बंगारप्पा, खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी व जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित देखील राहणार आहेत. अध्यक्षस्थानी खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर असतील. या स्पर्धा पुरुष आणि महिला फ्री स्टाईल, पुरुष ग्रेसो रोमन शैली अशा तीन प्रकारात आयोजित केल्या जातील आणि एकूण 10 वजनी गटांमध्ये कुस्तीपटूंमध्ये लढत होईल. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागातून येणाऱ्या कुस्तीपटूंसाठी शांतिनिकेतन महाविद्यालयात राहण्याची आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे. बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावरून शांतिनिकेतन शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी वाहने आणि खानपानाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
आमदार विठ्ठल हलगेकर म्हणाले, कुस्ती स्पर्धा हा खा ग्रामीण खेळ असून, या खेळाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये शांतिनिकेतन महाविद्यालयातर्फे राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी पुन्हा एकदा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी तोपीनाकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीचे सचिव राजेंद्र पाटील, कुस्ती प्रशिक्षक हणमंत पाटील, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे निवृत्त संचालक जी.एन. पाटील, पीयू विभागाचे समन्वय अधिकारी प्रभू शिवनाईकर, प्रा. सुरेश भोसले, तोपीनकट्टी श्री महालक्ष्मी ग्रुप एज्युकेशन सोसायटीच्या जनसंपर्क अधिकारी मनीषा हलगेकर आदी उपस्थित होते.