बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये सर्रास ठिकाणी स्मार्ट सिटी अंतर्गत झालेल्या कामाचे वाभाडे निघत असून स्मार्ट सिटी कामकाजात भ्रष्टाचार झाल्यावर जणू शिक्कामोर्तबच झाले आहे.
शहरातील विविध ठिकाणी चव्हाट्यावर आलेल्या स्मार्ट सिटी कामकाजाचे प्रताप आता रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल नजीक पाहायला मिळाले असून या भागात बसविण्यात आलेल्या पेव्हर्स रस्त्याचे खच्चीकरण होऊन मालवाहू ट्रक अडकल्याचे समोर आले आहे.
रामतीर्थ नगर येथील गणेश सर्कल परिसरात पेव्हर्स रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र शहरातील इतर कामकाजाप्रमाणेच याठिकाणीही निकृष्ट दर्जाचे कामकाज स्मार्ट सिटी अंतर्गत झाले असून पेव्हर्स बसविण्यात आलेला रास्ता खचला आहे.
या भागात आता वाहने पार्क करणे देखील अवघड झाले असून मालवाहू ट्रक या पेव्हर्समध्ये अडकून बसल्याचे चित्र पाहायला मिळाले.
स्मार्ट सिटी अंतर्गत झालेली कामे हि घिसाडघाईने करत निकृष्ट दर्जाची असल्याचे समोर येत असून बोकाळलेल्या भ्रष्टाचाराचाही वास यातून येत आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरू नये.