बेळगाव लाईव्ह :समाजाच्या आर्थिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी सांगाती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि सांगाती महिला पतसंस्था करत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. या दोन्ही पतसंस्था शिनोळी औद्योगिक वसाहतीतील मुख्य सांस्कृतिक केंद्र झाल्या आहेत.
राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे कार्य देशाला दिशा देणारे ठरत आहे. त्याप्रमाणे सांगाती व सांगाती पतसंस्थेचा आदर्श सहकार क्षेत्राला घ्यावा लागेल, असे गौरव उद्गार उद्योगपती अप्पासाहेब गुरव यांनी काढले.
चंदगड तालुक्यातील शिनोळी औद्योगिक वसाहतीतील सांगाती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था आणि सांगाती महिला पतसंस्थेतर्फे सन 2023 -24 सालातील गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनी, सभासद, खेळाडू आणि विविध शासकीय परीक्षांमध्ये घवघवीत यश संपादन केलेले गुणी विद्यार्थी यांचा गुणगौरव समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.
याप्रसंगी एबीजी इंडस्ट्रियल प्रॉडक्टस प्रा. लि. उद्यमबाग, बेळगावचे व्यवस्थापकीय संचालक आप्पासाहेब गुरव प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. सांगाती पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन नारायण पाटील अध्यक्षस्थानी होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते र.बा. माडखोळकर महाविद्यालय चंदगडचे इतिहास विभाग प्रमुख प्रा. आप्पासाहेब धोंडीराम कांबळे यांनी सांगाती पतसंस्था आर्थिक विकासासह सामाजिक विकासासाठी करत असलेल्या प्रयत्नाचे कौतुक केले.
सर्वांनी शाहू फुले आंबेडकर यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा. विद्यार्थ्यांनी बदलत्या शैक्षणिक धोरणाचा अंगीकार करावा संघर्षाशिवाय यश नाही असे सांगून पालकांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात कारकीर्द घडवण्यासाठी प्रोत्साहित करावे. त्यांना बंधनातून मुक्त करून भरारी घेण्यासाठी उद्युक्त करावं असे आवाहन करून प्रा. कांबळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
प्रारंभी संस्थेचे संचालक व चंदगड शाखेचे चेअरमन हणमंत कृष्णा गावडे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगाती आणि संघातील महिला पतसंस्था या आर्थिक पतसंस्था असूनही या संस्थांचे मूळ ध्येय समाजाचे शैक्षणिक व सांस्कृतिक विकास असल्याचे स्पष्ट केले. या संस्था चंदगड तालुक्याच्या सर्व गावांमध्ये पोहोचल्या असल्याचे सांगून या संस्थांकडे लोक आदराने पाहतात याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगितले.
संस्थापक चेअरमन बाबुराव नेसरकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला आणि आपल्या मनोगतात गुणगौरव कार्यक्रम व संस्थेविषयी माहिती देऊन ग्रामीण भागातील लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था शहरी भागाऐवजी ग्रामीण भागात सुरू केल्याचे सांगून संस्थेला सहकार्य करणाऱ्या सर्व घटकांचे आभार मानले. गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींना संबोधित करताना त्यांनी तुम्ही कितीही मोठे व्हा, पण आपल्या मातीशी असलेली नाळ तोडू नका असे सांगून शुभेच्छा दिल्या. यावेळी यंदा चौथी, सातवी, बारावी, पदवी व पदव्युत्तर परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी -विद्यार्थिनींचा रोख रक्कम, मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष नितीन पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपात सर्वांचे आभार मानून पुढील वाटचालीची माहिती दिली. येत्या दोन ते तीन महिन्यात कोर बँकिंग आणि बँक सोल्युशन प्रणाली सुरू करणार असल्याचे सांगून आधुनिकते शिवाय सहकाराला पर्याय नसल्याचे सांगितले.
याप्रसंगी संस्थेचे मार्गदर्शक एम. जी. पाटील, सर्वोदय शिक्षण संस्था कोवाडचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, प्रा. नारायण रानबा पाटील, आशा नेसरकर, प्रा. मनीषा आढाव, सांगाती महिला पतसंस्थेच्या चेअरमन मनीषादेवी पुंडलिकराव कदम-पाटील, व्हा. चेअरमन शांता बोकडे, सांगाती पतसंस्थेचे माजी चेअरमन सतीश सावंत, मोनाप्पा पाटील, संचालक व तुडये शाखेचे चेअरमन शरद पाटील, मारुती भोगण, हणमंत गाडीवड्डर, दशरथ कांबळे, राजश्री पाटील, अस्मिता करटे, सांगाती महिला पतसंस्थेच्या संचालिका स्वरूपा सावंत, प्रज्ञा वाबळे, प्रेमा भोगण, सुमित्रा गावडे, भारती पाटील आदींसह सर्व शाखांचे संचालक सभासद कर्मचारी पालक आणि हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.