बेळगाव लाईव्ह :निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे उड्डाणपूलांचे नुकसान झाले असल्यामुळे त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात येणार असल्याचे राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांनी सांगितले.
शहरातील सरकारी विश्राम धाम येथे आज शनिवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शहरातील रेल्वे फाटकांवरील रेल्वे ब्रिज अर्थात उड्डाणपुलांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याची यापूर्वी कल्पना नव्हती.
मात्र आता ही बाब निदर्शनास आली आहे. तेंव्हा या संदर्भात चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी सूचना रेल्वे खात्याकडे करण्यात येईल. तसेच ही बाब रेल्वे मंत्र्यांच्या देखील निदर्शनास आणून देण्यात येईल, असे राज्यसभा सदस्य कडाडी यांनी पुढे सांगितले.
पत्रकार परिषदेस माजी आमदार संजय पाटील, एम. बी. जिर्ली, भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, नगरसेवक हणमंत कोंगाली आदी उपस्थित होते.