बेळगाव लाईव्ह:गेल्या सात-आठ दिवसांपासून बेळगाव शहर परिसरात अधून मधून परतीचा पाऊस पडत आहे. मात्र गेल्या दोन दिवसापासून अल्पावधीसाठीच मात्र मुसळधार हजेरी लावणाऱ्या या पावसामुळे पिकांना धोका निर्माण झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गेल्या दोन दिवसापासून शहर परिसरात परतीचा पाऊस अचानक जोरदार हजेरी लावत आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये -जा करणारे पादचारी आणि दुचाकी वाहन चालकांची निवारा शोधण्यासाठी तारांबळ उडत आहे.
पाऊस इतक्या वेगाने मुसळधार स्वरूप धारण करत आहे की दुचाकीस्वार गाडीच्या डिकीतून रेनकोट काढेपर्यंत भिजून जात आहेत. या पावसामुळे पुन्हा एकदा बऱ्याच रस्त्यांची दुरवस्था होण्याबरोबरच सकल भागात पाणी साचलेले पहावयास मिळत आहे.
शहराच्या अंतर्गत भागातील बहुतांश रस्त्यांची खड्डे पडून दुर्दशा झाली असल्यामुळे या खड्ड्यांमध्ये सध्या गढूळ पाणी साचले असून जे विशेष करून दुचाकी वाहन चालकांना अपघाताला निमंत्रण देणारे ठरत आहे. जोरदार हजेरी लावणाऱ्या परतीच्या पावसामुळे लेंडी नाल्याच्या आसपास असलेल्या शेतवडीत मोठ्या प्रमाणात पाणी साचून भात पिकाला फटका बसला आहे.
यंदाच्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी पोसवणीला आलेले भात पीक खाली पडले आहे.
परतीचा पाऊस अजून कांही दिवस असाच पडत राहिल्यास भात पीक मोठ्या प्रमाणात खराब होण्याची भीती वर्तवली जात आहे.