बेळगाव लाईव्ह :वडगाव येथील सरकारी मराठी शाळा क्र. 31 च्या इमारतीमध्ये कन्नड शाळेचे स्थलांतर करण्यात आल्यामुळे या ठिकाणचे बंद पडलेले योग मार्गदर्शन केंद्र पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी या शाळेमध्येच किंवा अन्य ठिकाणी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वडगाव येथील नाराज योगप्रेमी नागरिकांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.
वडगाव येथील चावडी जवळील स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू असलेल्या सरकारी मराठी शाळा क्रमांक 31 च्या इमारतीमध्ये देवांगनगर येथील कन्नड शाळेचे स्थलांतर करण्यात आले आहे.
त्यासाठी सदर शाळेमध्ये गेल्या पंधरा -सोळा वर्षापासून सुरू असलेल्या योग मार्गदर्शन वर्गाच्या खुल्या हॉलमध्ये डेस्क आणून ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळच्या वेळेत भरविण्यात येणाऱ्या योग मार्गदर्शन वर्गावर गंडांतर आले असून तो बंद पडला आहे. परिणामी या वर्गामध्ये नियमितपणे येणाऱ्या असंख्य योगप्रेमींची गैरसोय झाली आहे.
योगाला राष्ट्रीय कार्यक्रमात स्थान असताना देखील अशा पद्धतीने 31 नंबर शाळेतील योगासन वर्ग बंद पडण्यात आल्यामुळे योगप्रेमींमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तसेच सदर वर्ग पूर्ववत सुरू करण्यासाठी याच शाळेमध्ये किंवा जवळपास अन्यत्र त्वरेने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे (डीडीपीआय) केली आहे.
या संदर्भात बेळगाव लाईव्ह समोर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना वडगाव येथील योग प्रेमी नागरिकांनी सांगितले की, जवळपास 16 वर्षांपूर्वी वडगाव बाजार गल्ली येथील श्री मारुती मंदिरामध्ये तत्कालीन उपमहापौर संजय शिंदे यांच्या पुढाकाराने योगासनाचे वर्ग भरत होते. मात्र कालांतराने ते मंदिर छोटे पडत असल्यामुळे वडगाव चावडी जवळच्या या 31 नंबर मराठी शाळेमध्ये ते योगासनाचे वर्ग भरवण्याचे माजी उपमहापौर शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठरले. त्यानुसार जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांकडे सदर शाळेत योगासनाचे वर्ग भरवण्याची परवानगी द्यावी अशी विनंती करण्यात आली होती. जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी आमची विनंती मान्य केली. तसेच योगा हे राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत येत असल्यामुळे शाळा सुरू नसताना सकाळी लवकर 2 तास हे योगासन वर्ग भरवण्यास त्यांनी लेखी परवानगी दिली आहे.
तेंव्हापासून गेली 15-16 वर्षे दररोज सकाळी 2 तास वडगाव परिसरातील ज्येष्ठ नागरिक, युवक आणि महिला या ठिकाणी योगासनासाठी येत असतात. मात्र गेल्या दोन दिवसापासून शाळेतील खुल्या असलेल्या योगासन हॉलमध्ये डेस्क ठेवण्यात आले असून दुसऱ्या शाळेचे या शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आले आहे. परिणामी योगासन वर्ग भरवण्यास अडथळा निर्माण झाला असून हा वर्ग बंद पडला आहे.
तरी असे होऊ न देता शाळा सुरू होण्यापूर्वी सकाळी 2 तास या शाळेमध्ये योगासन वर्ग भरवण्यास जागा उपलब्ध करून द्यावी अशी आमची मागणी आहे. अचानक डेस्क आणून ठेवून कन्नड शाळेचा वर्ग भरवण्यास सुरुवात करण्यात आली आल्यामुळे योगा वर्ग भरवण्यास अडथळा निर्माण झाला आहे. त्याचप्रमाणे या ना त्या कारणाने मराठी शाळा बंद पाडण्याच्या कर्नाटक सरकारच्या कटकारस्थानाचा हा एक भाग आहे. तथापी याला देखील आमचा तीव्र विरोध असून यासंदर्भात आम्ही आता जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन सादर करणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.