Sunday, October 27, 2024

/

बहुरंगी आणि अटीतटीच्या लढतीत बंडखोरीवर ठरणार निकाल!

 belgaum

बेळगाव लाईव्ह विशेष : निसर्गसंपदा लाभलेला महाराष्ट्रातील चंदगड विधानसभा मतदार संघ हा येथील गटातटाच्या राजकारणामुळे आजवर प्रसिद्ध झाला आहे. विद्यमान आमदार राजेश पाटील यांच्यासह नंदाताई बाभुळकर, शिवाजीराव पाटील, विनायक उर्फ अप्पी पाटील यांच्यासारखे दिग्गज नेते विधानसभेच्या रणांगणात निवडणूक लढविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

महाराष्ट्रात आलेल्या राजकीय भूकंपानंतर महाविकास आघाडी आणि महायुती सोबत असलेल्या घटक पक्षातील इच्छुक नेत्यांमध्येही अंतर्गत कुरघोड्या सुरु असल्याचे चित्र सध्या चंदगड विधानसभा मतदार संघात दिसून येत आहे. इच्छुकांकडून सुरु असलेली लॉबिंग, वरिष्ठांकडून वरदहस्त असलेल्या उमेदवारांच्या नावे निश्चितीची होत असलेली चर्चा यातून निर्माण झालेले बंडखोर उमेदवार यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत चंदगड मतदार संघाचा निकाल बंडखोर उमेदवारच ठरवणार असे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

चंदगड मधील दिग्गज नेत्यांमध्ये मानसिंग खोराटे यांचेही नाव सध्या अग्रक्रमावर चर्चेत आहे. बंद असलेला दौलत कारखाना स्वतःच्या जीवावर सुरळीत चालवून दाखवत चंदगड विधानसभेत नागरिकांना रोजगार मिळवून दिला. तरुणांच्या रोजगार निर्मितीचे स्वप्न पूर्ण करत त्यांनी चंदगड विधानसभेत एक प्रकारे बदल घडवून आणला. त्यातून त्यांना लोकप्रियता लाभली. विशेषतः तरुणांमध्ये लोकप्रियता मिळविलेल्या मानसिंग खोराटे यांनी २०१९ साली कारखाना हाती घेतल्यानंतर थकीत बिले अदा केली. कामगारांची देणी टप्प्याटप्प्याने देऊन पूर्ण केली. केडीसीचा बोजा उतरवून कारखान्यावरील केडीसीचा अधिकार संपुष्टात आणला.Chandgad

एकीकडॆ राजेश पाटील आणि इतर विरोधकांकडून डिवचने सुरु असूनही त्यांनी आपले कार्य सुरु ठेवत विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार केला. यामुळे आता विद्यमान आमदार राजेश पाटील, इतर बंडखोर उमेदवार आणि मानसिंग खोराटे यांच्या लढतीमुळे चंदगड विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.

विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी शरद पवार गटाला रामराम ठोकून अजित पवार गटामध्ये प्रवेश घेतल्याने त्यांच्या समर्थकांचा रोष त्यांना ओढवून घ्यावा लागला. गोपाळ पाटील आणि नरसिंह पाटील यांच्या माध्यमातून असलेला मतांचा गठ्ठा राजेश पाटलांसाठी अडचणींचा ठरला. शरद पवार गटाला सोडल्याने बुद्धिजीवी मतदारांनी राजेश पाटलांवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीचे विभाजन झाल्यामुळे आधीच अडचणीत आलेल्या राजेश पाटलांना त्यांनी न केलेल्या विकासकामांमुळे टार्गेट करण्यात येत आहे. विकासकामांसाठी खर्च केलेल्या निधीचा हिशोब मागत जनतेने आमसभेची मागणी देखील केली. रस्ते, गटारी यापलीकडचा विकास चंदगड भागात व्हावा, यासाठी आमदारांनी कोणतेही प्रयत्न केले नसल्याचा आरोप जनतेतून होत आहे. केंद्राकडून निधी आणून स्वतःचे लेबल लावत विकासकामे राबविल्याचे फलक मतदार संघात लावल्याने जनता त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जात असून या सर्व गोष्टींमुळे यंदाच्या निवडणुकीत राजेश पाटलांची गोची झाली असून पाटलांना या निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे.

‘महाविकास’मधून नंदाताईंना उमेदवारी देण्यास त्यांच्याच पक्षाचे अमरसिंह चव्हाण, काँग्रेसचे गोपाळराव पाटील, अप्पी पाटील, विद्याधर गुरबे, उद्धवसेनेचे सुनील शिंत्रे, रियाज शमनजी यांची हरकत असल्यामुळे शरद पवार यांच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीची पहिली यादी काल जाहीर झाली असून या यादीतून नंदाताईंचे नाव वगळण्यात आले आहे, हि विशेष लक्षवेधी बाब ठरत आहे. मागीलवेळी निवडणूक झाल्यानंतर नंदाताईंनी विधानसभेत फिरकून पहिले नाही, त्यामुळे यावेळीही अशीच पुनरावृत्ती झाली तर कार्यकर्ते वाऱ्यावर पडतील अशी धारणा कार्यकर्त्यांनी मनात ठेवली आहे. शिवाय नंदाताईंना उमेदवारी दिल्यास इतर घटक पक्षातील कोणतेही नेते प्रचारासाठी येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महायुतीमध्येही असेच चित्र असून शिवाजीराव पाटील बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. आपल्याला उमेदवारी नाही मिळाली तरी आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढविणार असा निर्धार त्यांनी केला आहे. मानसिंग खोराटे निवडणूक रिंगणात उतरत असल्याने संध्यादेवी कुपेकर अडचणीत आल्या आहेत.

एकंदर वातावरण पाहता गटातटाच्या राजकारणाचा फायदास शिवाजीराव पाटील यांना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तविण्यात येत आहे. ज्यापद्धतीने कागल मतदार संघाची निवडणूक अटीतटीची ठरत आली आहे, त्याचप्रमाणे आता चंदगड मतदार संघाची निवडणूक देखील चुरशीची ठरणार हे निश्चित आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.