बेळगाव लाईव्ह : मागील आठवड्यात बेळगावमध्ये गाजलेल्या खून प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपींची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. बेळगावमधील रियल इस्टेट व्यावसायिक, उद्योजक संतोष पद्मण्णावर यांच्या खूनप्रकरणी अटक करण्यात आलेल्या चार संशयितांना दुसरे जेएमएफसी न्यायालयाच्या न्यायाधीश पंकजा कोन्नूर यांनी मंगळवारी चार दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश बजावला आहे.
पद्मण्णावर यांची पत्नी उमा पद्मण्णावर, बेंगळुरू येथील शोभित गौडा, पवन रामनकुट्टी यांची चौदा दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.
या प्रकरणातील चौथा संशयित मंजुनाथ बसाप्पा जोरकल याला दि.21 रोजी अटक करण्यात आली. त्यालादेखील न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली होती.
सर्व संशयितांची कसून चौकशी करण्यासाठी पोलिसांनी 22 ते 25 आक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. पोलिसांच्या मागणीची दखल घेत न्यायाधीशांनी चौघाही संशयितांना पोलिस कोठडी सुनावली आहे.
चौघाही संशयितांना माळमारुती पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिस चौकशीत त्यांच्याकडून आणखी कोणती माहिती बाहेर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पोलिस निरीक्षक जे.एम. कालीमिर्ची व त्यांचे सहकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.