Monday, December 30, 2024

/

नैसर्गिक मृत्यू नव्हे.. रियल इस्टेट व्यावसायिकाचा खूनच!

 belgaum

बेळगाव लाईव्ह : रिअल इस्टेट व्यवसाय करणाऱ्या संतोष दुंडाप्पा पद्मण्णावर (वय ४६, रा. अंजनेयनगर) याच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रकरणाचा उलगडा झाला असून हा नैसर्गिक मृत्यू नसून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मृत संतोष दुंडाप्पा पद्मण्णावर यांच्या पत्नीनेच आपल्या फेसबुक फ्रेंडच्या मदतीने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात पाच जणांवर एफआयआर दाखल झाला आहे. बुधवारी न्यायालयाची परवानगी घेऊन संतोषचा दफन केलेला मृतदेह उकरून काढून उत्तरीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

संतोषची मुलगी संजना हिने दिलेल्या फिर्यादीवरून त्याची पत्नी उमा, तिचा फेसबुक फ्रेंड शोभित गौडा, कामगार नंदा कुरिया, प्रकाश कुरिया व एक अनोळखी अशा एकूण पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची रवानगी हिंडलगा कारागृहात करण्यात आली आहे.

बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6.08 ते 6.50 यावेळेत त्याचा खून करून हृदयाघाताने मृत्यू झाल्याचे भासवण्यात आले असल्याचा आरोप संतोषच्या मुलीने केला होता. शवचिकित्सा अहवाल उपलब्ध झाल्यानंतर यासंबंधीची अधिक माहिती उजेडात आली असता संतोष पद्मन्नावर यांच्या पत्नीने झोपेच्या गोळ्या देऊन मारल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.Murder

याप्रकरणी बुधवारी रात्री माळमारुती पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती. बेंगळुरू स्थित शोभित गौडा आणि आणखी एका आरोपीला पोलिसांनी हुबळी येथे अटक करून बेळगावमध्ये आणल्यानंतर वैद्यकीय तपासणी करण्यात आली. प्रमुख आरोपी उमा पद्मन्नावर हिने आपल्या मित्रांच्या मदतीने संतोष पद्मन्नावर यांच्या खुनाचा कट रचून खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.

बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानयांग यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मृत संतोषच्या मुलीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे माळमारुती पोलीस स्थानकाचे सीपीआय कालीमिर्ची यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीना अटक करण्यात यश मिळविले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.