बेळगाव लाईव्ह :एक नोव्हेंबर हा काळा दिन सीमाभागात गांभीर्याने पाळण्यात येतो. गेल्या ६७ वर्षापासून हा काळा दिन आम्ही पाळत आलो आहोत आणि येणारा काळा दिन हाही आम्ही मोठ्या गांभीर्याने पाळणार आहोत.केंद्र सरकारचा निषेध म्हणून आम्ही हा दिन पाळतो, एक नोव्हेंबर १९५६ रोजी त्यावेळच्या मुंबई प्रांतातील मराठी भाषिक भाग अन्यायाने त्यावेळच्या म्हैसूर व आताच्या कर्नाटक राज्यात डांबण्यात आला.
सीमाभागात मोठा असंतोष माजला व आजही अन्यायाने मराठी भाषिक कर्नाटकाच्या कानडी जोखडात पडून आहेत. तेव्हा केंद्र सरकारने मराठी भाषिकांची वेदना समजून घेऊन लवकरात हा सीमाभाग महाराष्ट्रात विलीन करावा, अन्यथा सीमाप्रश्न सुटेपर्यंत आम्ही काळातील हा सुतक दिन म्हणून पाळत राहू. शासनाने येणाऱ्या काळा दिनाच्या सायकल फेरीला परवानगी देऊ अथवा ना देवो आम्ही ही सायकल फेरी निर्धाराने पार पाडू असा निर्धार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किनेकर यांनी व्यक्त केला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समिती बैठक रविवार दिनांक 13 रोजी मराठा मंदिर मंगल कार्यालय येथे संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनोहर किनेकर होते.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी प्रास्ताविक करून उपस्थित यांचे स्वागत केले . केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल केंद्र सरकारच्या अभिनंदनाचा ठराव उपस्थित सदस्यांची टाळ्यांच्या गजरात संमत करण्यात आला. भारताचे उद्योगपती रतन टाटा, मध्यवर्तीचे उपाध्यक्ष गोपाळ देसाई यांच्या आई पद्मावती बळवंत देसाई यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच बेळगाव ग्रामीण मतदारसंघ व यमकणमर्डी मतदार संघातून बेळगाव मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीवर नियुक्त झालेल्या नवीन सदस्यांची नावांचे वाचन केले व उपस्थित सदस्यांनी टाळ्याच्या गजरात त्याला अनुमोदन दिले.
यावेळी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे म्हणाले की समितीची संघटना दिवसेंदिवस कुमकुमत होत असल्यामुळे कानडी सक्ती वाढत आहे.
मराठी भाषिकांनी याचा विचार करून महाराष्ट्र एकीकरण समितीची पाठीशी राहिले पाहिजे व आपली ताकद वाढून मराठी भाषेवरील होणारे थांबवले पाहिजेत.सीमाभाग महाराष्ट्रात विलीन होईपर्यंत मराठी भाषिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्र राहावे तरच सीमा भागातील मराठी भाषिकांचे हित आहे. तरुणाने राष्ट्रीय पक्षाच्या नादी लागू नये, नजीकच्या काळात महाराष्ट्र एकीकरण समिती संघटना मजबूत करण्यासाठी तळागाळापर्यंत कार्य करूया. येणारा काळा दिन यशस्वी करूया असा निर्धार व्यक्त केला.
यावेळी बि डी मोहनगेकर, आर के पाटील,गोपाळ पाटील, मनोहर संताजी,मनोहर हुंदरे, मारुती परमेकर, एम जी पाटील, आदींनी आपले विचार व्यक्त केले. शेवटी लक्ष्मण होनगेकर यांनी आभार व्यक्त केले.