बेळगाव लाईव्ह : १ नोव्हेंबर रोजी समस्त सीमावासीयांच्यावतीने पाळला जाणारा काळा दिन, तसेच बेळगावमध्ये भरविण्यात येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्याविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने आयोजिण्यात येणारा महामेळावा याला परवानगी देऊ नये यासाठी आज बेळगावच्या कर्नाटक रक्षण वेदिकेच्या शिवराम गौडा गटाच्या वतीने निदर्शने करण्यात आली.
१ नोव्हेंबर असो किंवा मराठी भाषिकांचे कोणतेही मेळावे असोत.. यादरम्यान नेहमीच कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांची वळवळ सुरु होते. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली एकत्रित येणाऱ्या मराठी भाषिकांच्या एकजुटीमुळे कन्नड संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांच्या पायाखालची जमीन सरकते. यामुळेच प्रत्येकवेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नावाने बोंबाबोंब करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आजदेखील बेळगावमध्ये निदर्शने करत १ नोव्हेंबर रोजी काळा दिन आणि हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात आयोजिण्यात येणाऱ्या महामेळाव्यास परवानगी देऊ नये अशी मागणी करत शहर पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन सादर केले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या झेंड्याखाली आयोजिण्यात येणाऱ्या काळ्यादिनासाठी पोलीस विभागाने परवानगी देऊ नये, ज्याठिकाणी काळा दिन पाळला जाईल, त्या ठिकाणी राज्योत्सव साजरा करण्यात येईल, अशी वल्गनाही काही कार्यकर्त्यांनी केली आहे.
शिवाय महाराष्ट्र एकीकरण समितीवर बंदी घालण्यात यावी, काळ्या दिनी सभा घेणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
कन्नड संघटनांची हि वळवळ मराठी भाषिकांसाठी नवी नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात गेल्या ६६ वर्षांपासून सुरु असलेला लढा, महाराष्ट्रात जाण्याची लोकेच्छा आणि याचसाठी १ नोव्हेंबर रोजी आयोजिण्यात येणारी निषेध फेरी कोणत्याही कारणास्तव थांबणार नाही, परवनागी नसली तरीही दरवर्षीनुसार निषेध फेरी होणारच असा निर्धार मराठी भाषिकांनी केला आहे.