बेळगाव लाईव्ह : कित्तूर उत्सव आणि राणी कित्तूर चन्नम्मा यांच्या द्विशतकी विजयोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगावमध्ये भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उत्सवाच्या औचित्याने प्रसिद्ध गायक कुणाल गांजावाला आणि विनोदवीर साधू कोकिळा यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
२२ ऑक्टोबर रोजी बेळगाव जिल्हा क्रीडांगणावर सायंकाळी ४.०० वाजता कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध कन्नड विनोदी कलाकार, संगीत दिग्दर्शक साधू कोकील आणि झी कन्नड सारेगमप फेम कलाकारांचे कार्यक्रम तसेच राष्ट्रीय ख्यातीचे गायक कुणाल गांजावाला यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यासह बेळगावच्या नृत्यांगना रेखा हेगडे, प्रकाश चंदण्णा यांच्या कार्यक्रमांचेही आयोजन कित्तूर उत्सवादरम्यान करण्यात आले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांव्यतिरिक्त फायर आणि शॅडो शोचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
हे सर्व कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी विनामूल्य असून बेळगावमधील जनतेने या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी केले.