बेळगाव लाईव्ह : खादरवाडी येथे बनावट कागदपत्रे तयार करून धनादेश आणि डीडी च्या माध्यमातून दोघांच्या खात्यावरील 17 लाख 46 हजार रक्कम काढून घेतल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात आज दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरण हे खादरवाडी येथील बक्कापाच्या वारीशी निगडित आहे. ज्यावेळी या जमिनीची बेकायदेशीर खरेदी झाली त्यावेळी गावच्या कब्जेदार रयतेने या विक्रीला विरोध केल्यामुळे, गावच्या दबावाखाली येऊन जे गावातील सातबारा उताऱ्यावरील पंच होते त्या पंचाच्या वारसदारांनी ही रक्कम आपली नाही गावची आहे असे सांगून फसवणूक केल्याचा आरोप पुढे येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरमाण्णा वेंकट पाटील (खादरवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीत खादरवाडीत सुमारे ४१ एकर जमीन आहे. जमिनीच्या मालकांची संख्या ३२ आहे. त्यात फिर्यादी भरमाण्णा यांची आई लक्ष्मी पाटील व फिर्यादीची बहीण रेखा
अरुण मुरकुटे यांचाही समावेश आहे.
सर्वांनी मिळून ३ फेब्रुवारी २०२३ रोजी जमिनीची विक्री चौघा जणांना केली. जमिनीचा व्यवहार व्यवस्थित झालेला असताना धामणेकर नामक संशयिताने खोटी माहिती देऊन लक्ष्मी आणि रेखा यांचे आधार कार्ड आणि पॅनकार्ड मागून घेतले.
एका कोऱ्या कागदावर त्यांच्या सह्या घेतल्या. त्या आधारे बँकेतून धनादेश आणि डीडी वटवून घेतले. यासाठी बँक व्यवस्थापकाचे सहाय्य घेतले.
याद्वारे १७ लाखांची फसवणूक केली, अशी तक्रार दिली आहे. टिळकवाडी पोलिसांनी धामणेकरसह बँक व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.