बेळगाव लाईव्ह:विनेश फोगाट, साक्षी मलिक यासारख्या देशाच्या मातब्बर कुस्तीपटूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्यामुळे अलीकडे मुलींमध्ये कुस्तीची क्रेझ वाढत आहे.
तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकणाऱ्या आपल्या महिला मल्लांना पाहून पालक देखील प्रेरित होत असल्यामुळे त्यांचे देखील मुलींना प्रोत्साहन मिळत आहे. याचेच उदाहरण म्हणजे राज्यस्तरीय कुस्तीचे स्पर्धेत सुयश मिळवून परतलेल्या एका मुलीचे स्वागत, सत्कार करण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी अत्यानंदाने चक्क बेळगाव रेल्वे स्थानकावर धाव घेतली.
या पद्धतीने आपल्या आई-वडिलांसह समस्त गावकऱ्यांचे प्रोत्साहन लाभत असलेल्या या महिला कुस्ती कुस्तीपटूचे नांव आहे सिद्धी प्रशांत निलजकर.
बेंगलोर रामनगर येथे शालेय शिक्षण विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पडली. सदर स्पर्धेतील मुलींच्या 54 किलो वजनी गटात मराठी विद्यानिकेतन शाळेची विद्यार्थिनी तसेच कंग्राळी खुर्द गावची सुकन्या कु. सिद्धी प्रशांत निलजकर हिने विजेतेपद मिळवत राज्यस्तरीय सुवर्णपदक पटकावले आहे.
या कामगिरीमुळे आता तिची पुढील महिन्यात दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी कर्नाटक राज्याच्या कुस्ती चमूत निवड झाली आहे. सिद्धी हिला एकलव्य पुरस्कार विजेत्या पैलवान एनआयएस कुस्ती प्रशिक्षक स्मिता पाटील आणि डबल कर्नाटक केसरी पै. कृष्णा पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून परतलेल्या सिद्धी निलजकर हिचे आज शुक्रवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकावर कुटुंबीय व मित्रपरिवार यांनी पुष्पहार घालून अभिनंदन व स्वागत केले. या उत्स्फूर्त स्वागताप्रसंगी तिची आई व वडील प्रशांत निलजकर, बाबू पावशे, किसन पाटील, प्रवीण चव्हाण आदींसह बहुसंख्य हितचिंतक उपस्थित होते.