बेळगाव लाईव्ह :बेंगलोर-धारवाड वंदे भारत रेल्वे सेवेचा बेळगावपर्यंत विस्तार करण्यास “अदृश्य हात” जाणीवपूर्वक अडथळा आणत आहेत, असे धक्कादायक विधान करून बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी चिंता व्यक्त केली आहे.
या प्रकरणामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. विकासात अडथळा आणणाऱ्या छुप्या शक्तींबद्दल अनेक रहिवाशांनी दीर्घकाळ अंदाज लावला होता. शेट्टर यांनी आता थेट ती चिंता व्यक्त केली असली तरी यामध्ये गुंतलेल्यांबद्दल वाच्यता केलेली नाही.
तथापि त्या शक्तींनी त्यांचा अडथळा सुरूच ठेवल्यास त्यांना त्यांची ओळख उघड करण्यास भाग पाडले जाईल, असा इशारा खासदार शेट्टर यांनी दिला आहे.
विजय कर्नाटक कन्नड दैनिकाने आयोजित केलेल्या व्हीके बेळगाव विकास शिखर परिषदेमध्ये बोलताना खासदार शेट्टर यांनी उपरोक्त इशारा दिला. काल रविवारी त्यांनी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्यालाही हजेरी लावली.
‘वंदे भारत’ विस्ताराला अनेक महिन्यांपूर्वी मंजूर मिळाली आहे आणि सर्व आवश्यक तांत्रिक मंजुऱ्या मिळाल्या आहेत. मात्र सर्व प्रक्रियात्मक टप्पे पूर्ण होऊनही या मार्गावर रेल्वेसेवा सुरू झालेली नाही. “मी सतत जबाबदार अधिकाऱ्यांना कृती करण्याचे आवाहन करत आहे,” असे सांगून शेट्टर यांनी वंदे भारतच्या कोंडीवर मात करण्याच्या त्यांच्या समर्पणावर जोर दिला. खासदार जगदीश शेट्टर यांच्या टिप्पण्यांचा लोकांमध्ये जोरदार प्रतिध्वनी उमटत आहे.
कारण अनेकांचा असा विश्वास आहे अज्ञात प्रतिकूल प्रभावांमुळेच बेळगावच्या पायाभूत सुविधांची प्रगती कमी झाली आहे. शेट्टर यांनी दिलेला इशारा लक्षात घेता वंदे भारत रेल्वे बेळगावपर्यंत विस्तारण्याच्या बाबतीतील विलंब कायम राहिल्यास ते खरोखरच या अडथळा आणणाऱ्या शक्तींचा पर्दाफाश करतील का? याचे उत्तर येणारा काळच देणार आहे.