बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहर आणि परिसरात पतंग उडविण्याची हौस जीवघेणी ठरत आहे. मांजामुळे नागरिकांनाच नव्हे तर, आकाशात मुक्तपणे भ्रमंती करणाऱ्या मुक्या पक्ष्यांच्याही जीवावर बेतत असून आज बेळगावमध्ये देखील पतंगाच्या मांजात घुबड अडकून जखमी अवस्थेत गटारीत पडल्याचे निदर्शनात आले.
हि बाब पक्षीप्रेमींच्या निदर्शनात येताच मांजात सापडलेल्या घुबडाची सुटका करून त्याला वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. बाळाप्पा गुडगनट्टी आणि वाजीद हिरेकुडी यांनी तात्काळ घुबडाची सुटका करून घुबडाला वनविभागाच्या ताब्यात दिले आहे.
सप्टेंबर महिन्यात पतंग उडविण्यास सुरुवात होते. पतंगप्रेमी पतंग उंच उडवण्यास उत्सुक असताना, पतंगासाठी वापरल्या जाणाऱ्या मांजामुळे अपघाताचा धोका वाढत आहे. मांजा धोकादायक ठरत असल्याने अपघात होऊन आजवर अनेक जणांचे प्राण गेले आहेत, शिवाय कित्येकजण जखमी झाले आहेत.
बाजारात उपलब्ध असणाऱ्या चिनी मांजामुळे सर्रास असे अपघात घडत असून बेळगावमध्ये मांजा विक्रीवर बंदी घालूनही मांजाची विक्री सुरु असल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
पतंगाच्या मांजामुळे जीवावर बेतण्याच्या घटनेत वाढ होत चालल्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या अपघातांची दखल घेत तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ के. त्यागराजन यांनी मागील दोन वर्षांपूर्वी पतंग उत्पादक, विक्रेते तसेच लहान मुले व तरुणांना पतंग उडवण्यासाठी मांजाचा वापर न करण्याचा इशारा देत मांजा विक्रीवर बंदी घातली होती. परंतु आजही तरुणांकडून मांजाचा वापर राजरोसपणे सुरु आहे. कधी उड्डाणपूल, तर कधी झाडांच्या फांद्या तर कधी आणखी कोणत्या ठिकाणी अडकलेल्या, पतंगाला लागलेल्या मांजामुळे अनेक ठिकाणी मांजाची शिकार वाहनचालक तर कधी पादचारी ठरत आहेत.
मांजामुळे अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. तर काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा धोकादायक मांजाविक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.