बेळगाव लाईव्ह :बेळगाव -बेंगलोर सकाळच्या विमान फेरीला उत्तम प्रतिसाद मिळत असतानाही इंडिगो एअरलाइन्स येत्या 27 ऑक्टोबरपासून ही विमान फेरी बंद करणार असल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय व नुकसान होणार असून सदर विमान फेरी पूर्ववत सुरू ठेवावी, अशी मागणी खासदार जगदीश शेट्टर यांनी केंद्रीय नागरिक उड्डाण मंत्री के. आर. नायडू यांच्याकडे केली आहे.
बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी गेल्या बुधवारी 16 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री किंजरापू राममोहन अर्थात के. आर. नायडू यांची भेट घेऊन बेळगाव -बेंगलोर सकाळच्या उड्डाणासंदर्भातील मुदतवाढ देण्याची मागणी केली.
बेळगाव -बेंगलोर विमान फेरीला मागील वर्षभरात 82 टक्के प्रतिसाद मिळून देखील विमान फेरी बंद करण्यात येत आहे. यामुळे सकाळच्या सत्रात बेंगलोरहून बेळगावला येणाऱ्यांची गैरसोय होणार असून त्यासाठी इंडिगो एअरलाइन्सला सेवा सुरू ठेवण्याची विनंती करण्याची विनंती खासदार शेट्टर यांनी केंद्रीय मंत्र्यांना केली. त्याचबरोबर पुणे, चेन्नई, लखनौ, कोचीन, म्हैसूर, सुरत, मुंबई या शहरांना विमान सेवा सुरू करण्याबरोबरच बेळगावहून बेंगलोर आणि मुंबई मार्गावर एअरबस सारखी मोठी विमाने चालवण्याचा प्रस्ताव खासदारांनी दिला.
त्याचप्रमाणे उडान -3 योजनेची पुढील दशक भरासाठी अंमलबजावणी करावी आणि त्यामध्ये बेळगावचाही समावेश करावा अशी मागणी देखील खासदार शेट्टर यांनी केली.
याप्रसंगी केंद्रीय मंत्री के. आर. नायडू यांनी खासदार शेट्टर यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. खासदारांच्या बाबी गांभीर्याने घेत मंत्री नायडू यांनी संभाव्य उपाय शोधण्यासाठी इंडिगोच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचे आश्वासन दिले. बेळगाव विमानतळावरून पुणे, चेन्नई, कोचीन, लखनौ, म्हैसूर आणि सुरत यासह नवीन स्थळांपर्यंत उड्डाण सेवा विस्तारित करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
दरम्यान, सध्या मुदत संपल्याने बेळगाव बेंगलोर सकाळची इंडिगो विमान फेरी बंद करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात नवीन विमाने इंडिगोकडे दाखल होताच विमान फेरीपूर्वक केली जाईल, असे इंडिगोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.