बेळगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संकेश्वर -बैलहोंगल दरम्यानचा 6 पदरी रस्त्यांच्या प्रकल्पास अडथळा ठरणारा वादग्रस्त हजरत गुलाबशाह दर्गा हटवून तो जवळच दुसऱ्या ठिकाणी विस्थापित केला जाईल आणि जिल्हा प्रशासनाकडून ही प्रक्रिया येत्या आठवड्याभरात हाती घेतली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या अध्यक्षतेखाली आज बुधवारी सकाळी आयोजित हजरत गुलाबशाह दर्गा व्यवस्थापन मंडळ, मुल्ला-मौलवी आणि दर्गा समर्थकांच्या बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते.
संकेश्वर -बैलहोंगल दरम्यानचा 6 पदरी रस्त्यांचा प्रकल्पाला हुक्केरी तालुक्यातील हत्तरगी येथील हजरत गुलाबशाह दर्ग्याचा अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्याचा प्रकल्प या दर्ग्यामधून राबविण्यात येत असल्यामुळे प्रकल्पाला जोरदार विरोध केला जात आहे. परिणामी दर्ग्याचा भाग वगळता या रस्ते प्रकल्पाचे सर्व काम पूर्ण झाले आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय झालेल्या आजच्या बैठकीत बोलताना दर्गा प्रमुख म्हणाले की, हजरत गुलाबशाह दर्गा अत्यंत जुना इतिहासकालीन दर्गा असून मुसलमान, हिंदू ख्रिश्चन वगैरे लाखो लोकांचे श्रद्धास्थान आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून म्हणजे 1957 पासून या दर्ग्या संदर्भातील पंचायत उतारे वगैरे सर्व कागदपत्रे आमच्याकडे आहेत यापूर्वी गेल्या 2003 मध्ये या दर्ग्यासंदर्भात वाद निर्माण झाला होता मात्र तत्कालीन जिल्हाधिकारी अंजुम परवेज यांनी सदर दर्ग्याच्या वास्तूला हात लावला जाणार नाही, तो हटवले जाणार नाही.
अशी लेखी हमी दिली आहे मात्र आता रस्त्याच्या बांधकामासाठी हा दर्गा हटवण्याचा आदेश काढण्यात आला आहे मात्र आम्हाला विश्वास आहे आशा आहे की सध्याचे राज्यातील निधर्मी सरकार हजरत गुलाब शहा दर्गा हटवला जाणार नाही याची काळजी घेऊन योग्य तो तोडगा काढेल. तसेच आमची विनंती आहे की, अनेक युगांपासून अस्तित्वात असलेला हा दर्गा हटवला जाऊ नये.
यावेळी प्रशासनाची बाजू मांडताना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, हजरत गुलाब शहा दर्ग्याच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीत चर्चा झाली आहे. बैलहोगल -संकेश्वर बायपासद्वारे संबंधित ठिकाणी 6 पदरी रस्त्याचा प्रकल्प राबविला जात आहे हत्तरगी जवळील हजरत गुलाब शहा दर्ग्याचे ठिकाण वगळता या प्रकल्पाचे सर्व काम झालेले आहे. हा प्रकल्प 358 कोटी रुपयांचा आहे. येणाऱ्या सर्व समस्या दूर करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला असून फक्त आता हजरत गुलाब शहा दर्ग्याची समस्या बाकी आहे. धार्मिक वास्तु किंवा त्यासंबंधीच्या वास्तू राष्ट्रीय प्रकल्पांना अडथळा निर्माण करत असतील तर त्या मूळ ठिकाणाहून हटवून पर्यायी ठिकाणी विस्थापित केल्या जाव्यात, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे या आदेशानुसार मागील वर्षी हुबळी येथील एक दर्गा विस्थापित करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने हजरत गुलाब शहा दर्ग्या संदर्भात आम्ही पुढाकार घेऊन पावले उचलली आहेत सर्वांशी समन्वय साधून सलोखा राखत या समस्येवर तोडगा काढला आहे.
त्यानुसार सदर दर्ग्याच्या ठिकाणी जो रस्ता होणार आहे, त्याला लागून एक मालकी जमीन आहे. ही सुमारे 11 गुंठे जमीन कायदेशीर करून वक्फ कमिटीच्या माध्यमातून गुलाब शहा दर्गा कमिटी या नावाने एक समिती स्थापन केली आहे. संबंधित जमीन यापूर्वीच या समितीच्या नावावर करण्यात आली आहे. त्या संदर्भातील विक्री करारही आमच्याकडे आहे. कंत्राटदाराला संबंधित जमिनीत दर्ग्याची नवी वास्तू उभारण्यास सांगण्यात आले आहे. ती वास्तू तयार झाल्यानंतर हुबळी येथे दर्गा विस्थापित करण्यासाठी जी प्रक्रिया राबविण्यात आली तीच प्रक्रिया गुलाब शहा दर्ग्याच्या बाबतीत राबविली जाईल.
हजरत गुलाब शहा दर्ग्याच्या चारी बाजूला कपड्याचे पडदे -कनातील उभारल्या जातील. त्यानंतर दर्ग्याचे मुल्ला मौलवी वगैरे प्रमुख मंडळी आणि आमचे अधिकारी दर्ग्यामध्ये जाऊन तेथील कबरीतील पवित्र अवशेष, वस्तू विधिवत योग्य पद्धतीने दर्ग्याच्या नव्या वास्तूमध्ये हलवतील. त्या ठिकाणी त्यांची पुनर्रस्थापना झाल्यानंतरच रस्त्याचे बांधकाम सुरू केले जाईल अशी माहिती देऊन येत्या आठवड्याभरात दर्ग्याच्या चांगल्या नव्या वास्तूची उभारणीचे काम हाती घेऊन दर्गा स्थलांतराची प्रक्रिया सुरू केली जाईल, असे जिल्हाधिकारी रोशन यांनी स्पष्ट केले. बैठकीस बेळगाव शहराचे आमदार असिफ (राजू) सेठ, जि. पं. सीईओ राहुल शिंदे, बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आदी उपस्थित होते.