बेळगाव लाईव्ह :नुकसान भरपाई पोटी भूसंपादित केलेली जमीन मूळ मालकाला परत करण्याद्वारे शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी.बी. रोड पर्यंतच्या वादग्रस्त रस्त्याचे प्रकरण मिटले आहे. मात्र असे असताना या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणे, पत्रकार परिषद घेणे वगैरे जे प्रकार केले जात आहेत ते चुकीचे आहे. बेळगाव महापालिका बरखास्त करण्याची मागणी तर अत्यंत चुकीची आहे, असे स्पष्ट मत माजी आमदार व महापौर रमेश कुडची यांनी व्यक्त केले.
शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी.बी. रोडपर्यंतच्या वादग्रस्त रस्त्याप्रकरणी बेळगाव महापालिका बरखास्त केली जावी अशी मागणी काही नेते आणि संघटनांकडून केली जात आहे. या संदर्भात आज मंगळवारी सकाळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना माजी महापौर कुडची यांनी उपरोक्त मत व्यक्त केले. ते म्हणाले की, बेळगाव महापालिकेने भूसंपादित केलेली रस्त्याची जागाच मूळ मालकाला परत केली असताना शहरातील कांही नेत्यांनी पत्रकार परिषद घेण्याची गरजच काय? हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा म्हणजे महापालिका सभागृहाला 2 कोटी रुपयांपर्यंत नुकसान भरपाई मंजूर करते येते, 20 कोटी रुपये नाही असे जे सांगितले जात आहे, ते देखील साफ चुकीचे आहे. महापालिका सभागृहाने रस्त्याची संबंधित जागा मूळ मालकाला परत करण्यापूर्वी 20 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईचा ठराव मंजूर केला. तत्पूर्वी आठ दिवस आधी महापालिकेच्या लेखास्थायी समितीने एका प्रकरणात 18 कोटी रुपयांचे बिल मंजूर केले होते. स्थायी समितीला 18 कोटी रुपयांचे बिल करण्याचा अधिकार आहे तर 20 कोटींची नुकसान भरपाई मंजूर करण्याचा अधिकार महापालिका सभागृह कसा काय नसू शकतो?
मुळात सध्या अस्तित्वात असलेले बेळगाव महापालिकेचे सभागृह हे निवडणूक झाल्यानंतर वर्ष -दीड वर्षांनी अस्तित्वात आले आहे. त्या वर्ष -दीड वर्षाच्या महापालिकेवरील प्रशासकीय कारकिर्दीच्या कालावधीत घडलेल्या चुकीचा दोष तुम्ही नव्याने अस्तित्वात आलेल्या सभागृहाला देणे कितपत योग्य आहे. बेळगाव महापालिकेत मी 25 वर्ष नगरसेवक, महापौर आणि शहराचा आमदार या नात्याने कार्य केले असल्यामुळे मलाही सर्व कायदे -कानून माहित आहेत. तुम्ही 20 कोटींचा प्रस्ताव मांडा आम्ही तो मंजूर करू असे या सभागृहाने सांगितले नव्हते. सभागृहाचा कांही संबंध नसताना स्वतः महापालिका आयुक्तांनी तसा प्रस्ताव सभागृहात मांडला. परिणामी सभागृहाने तो मंजूर केला. अलीकडेच जिल्हा पालक मंत्र्यांनी सुवर्ण विधानसौध येथे एक पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये आमच्या आमदारांनी संबंधित जागा मूळ मालकाला परत करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांना दिले आहेत असे त्यांनी सांगितले होते, हे लक्षात घेतले पाहिजे. महापालिकेवरील प्रशासकीय कार्यकाळात बरेच अधिकारी व आयुक्त काम करून गेले आहेत. त्यांनी कशा पद्धतीने कारभार केला हे देखील पाहिलं पाहिजे.
ते सर्व सोडून तुम्ही विद्यमान सभागृहावर का घसरत आहात? घडल्या प्रकरणाशी सभागृहाचा काहींच संबंध नाही. कारण सभागृहाने रस्त्यासाठी जागा ताब्यात घ्या म्हणून सांगितले नाही किंवा बुडाला संबंधित तो रस्ता तयार करण्यास सांगितलेले नाही.
या पद्धतीने काहीही तीळ मात्र संबंध नसताना सभागृह बरखास्त करण्याची मागणी कशासाठी केली जात आहे? विद्यमान नगरसेवकांचा घडल्या प्रकरणाशी काय संबंध आहे? कोणाच्या चुकीमुळे सभागृह बरखास्त केले पाहिजे? असा माझा संबंधितांना सवाल आहे, असे माजी महापौर रमेश कुडची शेवटी म्हणाले.