बेळगाव लाईव्ह : हिंदू धर्मात प्रत्येक सणाला वेगळे असे महत्व आहे. प्रत्येक सणाला वेगवेगळ्या चालीरीती, परंपरा जोपासल्या जातात.
शहरीकरण वाढल्याने अलीकडे सर्रास जुन्या चालीरीतींना फाटा देण्यात आल्याचे पाहायला मिळते. मात्र ग्रामीण भागात आजही वर्षानुवर्षे चालत आलेल्या परंपरा आजही एका पिढीकडून दुसऱ्या पिढीच्या माध्यमातून जपल्या जात असल्याचे चित्र पाहायला मिळते.
कंग्राळी बुद्रुक गावातदेखील पिढ्यानपिढ्या चालत आलेली दिवाळीच्या आरतीची परंपरा आजही सुरु आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य लाभावे यासाठी घरातील स्त्रिया पतीचे, मुलांचे, भावाचे औक्षण करतात.
कंग्राळी बुद्रुकमधील गावातदेखील अंगणात कुटुंबातील सदस्यांना थांबवून औक्षण करण्याची परंपरा पार पाडण्यात आली.
ज्या पद्धतीने विविध ठिकाणी विविध पद्धतीने दसरा साजरा केला जातो, त्यानुसार दिवाळीच्याही काही चालीरीती आहेत. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज अशा विविध पद्धतीने साजऱ्या होणाऱ्या दिवाळी सणात विविध चालीरीती पार पाडल्या जातात.
यामुळे धार्मिक बाबींच्या माध्यमातून समाधान तर मिळतेच शिवाय कुटुंबाने एकत्रित येऊन सण साजरा केल्याने स्नेह देखील वृद्धिंगत होतो, हे विशेष…!