बेळगाव लाईव्ह:भाषावार प्रांत रचनेवेळी बेळगावसह सीमा भाग अन्यायाने कर्नाटकात डांबणाऱ्या केंद्र सरकारच्या निषेधार्थ दरवर्षीप्रमाणे 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्याबरोबरच त्या दिवशीच्या मुक सायकल फेरीत सर्वांनी विशेष करून युवकांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांनी केले.
येत्या 1 नोव्हेंबर काळा दिना संदर्भात जनजागृतीसाठी आयोजित बैठक आज बुधवारी वडगाव येथील श्री ज्ञानेश्वर मंदिरामध्ये पार पडली. याप्रसंगी कोंडुसकर बोलत होते.
गेल्या कांही दिवसांपासून 1 नोव्हेंबर रोजी काळा दिन पाळण्यासंदर्भात विभाग वार जनजागृती केली जात आहे. त्याचा एक भाग म्हणून शहरात विविध ठिकाणी बैठका घेतल्या जात आहेत. त्याच अनुषंगाने आयोजित वडगाव आणि जुने बेळगाव या भागातील म. एकीकरण समिती कार्यकर्त्यांच्या आजच्या बैठकीमध्ये दरवर्षीप्रमाणे या भागातील कार्यकर्ते आणि जनताचा काळा दिनाच्या सायकल फेरीतील मोठा सहभाग निश्चित करण्यात आला.
त्याचप्रमाणे नव्या युवा पिढीला सीमाप्रश्न चांगल्या पद्धतीने समजावा यासाठी प्रयत्न करण्याचे बैठकीत ठरले. याबरोबरच आपल्यावर झालेल्या अन्यायाचा निषेध म्हणून 1 नोव्हेंबर रोजी एक दिवस मराठी भाषिकांनी आपल्या घरासमोरील दिवाळीचे आकाश कंदील पेटवू नयेत, असे आवाहन करण्यात आले.
याप्रसंगी बोलताना रमाकांत कोंडुसकर म्हणाले की, गेल्या एक नोव्हेंबर 1956 रोजी देशात भाषावार प्रांतरचना झाली आणि त्यावेळी जाणून बुजून अन्यायाने बेळगावसह संपूर्ण मराठी भाषिक सीमाभाग सध्याचे कर्नाटक आणि तत्कालीन म्हैसूर राज्याला जोडला गेला. याचा निषेध म्हणून तेंव्हापासून मराठी भाषिक 1 नोव्हेंबर हा काळा दिन पाळून निषेध सायकल फेरी काढतात. दुर्देवाने काळा दिन आणि निषेध सायकलफेरीचे आजच्या युवकांना गांभीर्य नाही आहे. आमच्या मराठी युवकांना आपल्याकडे आकर्षित करून राष्ट्रीय पक्ष व त्यांचे नेते आपला स्वार्थ साधत आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या विरोधात त्यांची डोकी भडकवण्याचे काम करत आहेत. सीमा प्रश्नाचा लढा कर्नाटक सरकारच्या विरोधात नव्हे तर सीमाभागातील मातृभाषेसाठी, मराठी भाषा व संस्कृती टिकवण्यासाठी आहे. त्याचप्रमाणे भाषावार प्रांतरचनेवेळी अन्याय करणाऱ्या केंद्र सरकार विरुद्ध आहे. तेव्हा दरवर्षीप्रमाणे एक नोव्हेंबर आपण सर्वांनी काळा दिन म्हणून पाळावा आणि त्यादिवशीच्या मुक सायकल फेरीमध्ये युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन कोंडुसकर यांनी केले.
काळा दिनाच्या मुक सायकल फेरीत वडगाव जुने बेळगाव येथील कार्यकर्ते व नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे आणि आजच्या युवा पिढीला सीमा लढा कळावा या उद्देशाने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीचा सण असल्यामुळे काळा दिन न पाळू नये. सायकल फेरी काढू नये, असे प्रशासनाकडून सांगितले जात असले तरी आमची दिवाळी त्याच दिवशी खऱ्या अर्थाने साजरी होईल ज्या दिवशी बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात सामील होईल. तेंव्हा येत्या 1 नोव्हेंबर रोजी या भागातून जास्तीत जास्त कार्यकर्ते सायकलफेरी सहभागी होतील हे पाहण्याचे जबाबदारी आमची असेल स्थानिक नेत्यांनी यावेळी बोलताना सांगितले. बैठकीस वडगाव व जुने बेळगाव परिसरातील आजी -माजी लोकप्रतिनिधी, समिती कार्यकर्ते व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.