बेळगाव लाईव्ह : गोवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जीएमआर गोवा एअर कार्गो रोड शो निमित्ताने शहरातील व्यापारी, उद्योजकांसह वाहतूकदार, हवाई निर्यातदार आणि आयातदार यांचा मेळावा नुकताच उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.
बेळगाव शहरातील क्लब रोडवरील हॉटेल इफा येथे आयोजित या मेळाव्यात मार्गदर्शन करण्यासाठी गोव्याचे मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ चालविण्यास घेतलेल्या जीएमआर कंपनीचे तेथील एअर कार्गो सुविधाचे प्रमुख पुरुषोत्तमसिंग ठाकूर आणि अन्य एक प्रमुख सत्यजित भट्टाचार्य उपस्थित होते. या उभयतांनी उपस्थितांना मोपा विमानतळावरील एअर कार्गो अर्थात हवाई मालवाहतुकीचा जीएमआर कंपनीने कसा कायापालट केला आहे. हवाई मालवाहतुकीसाठी कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत त्याची थोडक्यात माहिती दिली. तसेच कशा पद्धतीने आपली विविध उत्पादने परदेशात निर्यात करण्याच्या करण्याच्या माध्यमातून आपण स्वतःबरोबरच आपले शहर, राज्य आणि देशाची अर्थव्यवस्था कशी सुधारू शकतो, याबद्दल मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे बेळगाव शहर परिसरातील व्यापारी उद्योजक वगैरे संबंधित सर्वांनी जी एम आर कंपनीने मोपा विमानतळावर उपलब्ध केलेल्या एअर कार्गो सुविधेचा मुक्तपणे लाभ घेऊन आपला उत्कर्ष साधावा असे आवाहन करण्याबरोबरच येथील स्थानिक उत्पादनांना परदेशातील ग्राहक मिळवून देण्याचे आश्वासनही पुरुषोत्तमसिंग ठाकूर आणि सत्यजित भट्टाचार्य यांनी दिले.
सदर मेळाव्याचे औचित्य साधून बेळगाव शहरातील युवा भाजीपाला वितरक सागर पाटील यांचा उदयोन्मुख आश्वासक निर्यातदार म्हणून परिचय करून देण्यात आला.सदर मेळाव्यास बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे सदस्य असलेले लहान-मोठे व्यापारी, उद्योजक, भाजीपाला व्यापारी, मसाल्याचे व्यापारी, रस्तेमार्गे बेळगाव -गोवा मालवाहतूक करणारे वाहतूकदार बहुसंख्येने उपस्थित होते.
सध्या भारतातील 16 विमानतळं अंदानी समूहाच्या जीएमआर कंपनीच्या अखत्यारीत आहेत. आता गोव्याचे मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) देखील या कंपनीने चालविण्यास घेतले असून परदेशातील निर्यात वाढविण्यासाठी उत्तम सुविधा उपलब्ध करून दिले आहेत. विशेष करून बेळगावसाठी महत्त्वाचे म्हणजे भाजीपाला साठविण्यासाठी मोपा विमानतळाच्या ठिकाणी चांगली स्टोरेज व्यवस्था करण्यात आली आहे.
युरोपीयन देशात निर्यात सुरू करण्यासाठी जीएमआर कंपनीला गोवा सरकारकडून अपेडा प्रमाणपत्र देखील प्राप्त झाले आहे. या गुणवत्ता प्रमाणपत्राच्या माध्यमातून येत्या जानेवारीपासून युरोपातील निर्यातीला प्रारंभ होणार आहे. मोठ्या प्रमाणात निर्यातीसाठी आवश्यक जीएमआर कंपनीने मोपा विमानतळा जवळ प्रचंड मोठ्या पॅक हाऊसची निर्मिती देखील केली आहे. जवळपास वीस-एक एकरमध्ये हे विशालकाय पॅक हाऊस उभारण्यात आले आहे.