बेळगाव लाईव्ह : लाखो मराठी भाषिकांच्या मनातील आस, अन्यायाने डांबलेला सीमाभाग महाराष्ट्रात सामील करण्याचा ध्यास यासाठी गेल्या ६६ वर्षांपासून सीमाभागात काळा दिन पाळला जातो.
काळ्या दिनी मूक फेरी काढून महाराष्ट्रात जाण्याची तीव्र लोकेच्छा आणि कर्नाटकी अन्यायाच्या विरोधात तसेच केंद्र सरकारच्या विरोधात निषेध नोंदविला जातो. काळा दिन पाळण्यासाठी शासनाकडून नेहमीच निर्बंध लादले जातात यानुसार यंदाही कोणत्याही कारणास्तव काळा दिन साजरा करू दिला जाणार नाही अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव जिल्हा पंचायत सभागृहात आयोजित कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पूर्व तयारी बैठकीत बोलताना दिली.
कन्नड संघटनांनी १ नोव्हेंबर रोजी राज्योत्सव दिन भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी तयारी सुरु केली असून यंदाचा राज्योत्सव मोठ्या थाटात साजरा केला जावा यासाठी आधीपासूनच प्रशासनाच्या पाठीला तगादा लावला आहे.
त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाही कर्नाटक राज्योत्सव 1 नोव्हेंबर रोजी मोठ्या थाटात साजरा होणार आहे, असे या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
ऐन दिवाळी सणाच्या दिवशी म्हणजे १ नोव्हेंबरला बेळगावात कर्नाटक राज्योत्सव साजरा केला जाणार आहे.राज्योत्सवाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती तयारी करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
आज बरोबर महाराष्ट्र समितीच्या वतीने एक नोव्हेंबर दिवशी आयोजित करण्यात आलेल्या काळा दिनाला कदापिही परवानगी दिली जाणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.