बेळगाव लाईव्ह :कित्तूर उत्सव आणि चन्नम्मा यांनी मिळविलेल्या विजयाचा 200 वा विजयोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून सर्व ती सिद्धता करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
कित्तूर उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कित्तूर येथे आज मंगळवारी उत्सवाच्या पूर्वतयारीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. कित्तूर उत्सव आणि चन्नम्मा यांनी मिळविलेल्या विजयाचा 200 वा विजयोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून अनेक वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.
चन्नम्मा उत्सवाच्या ऑक्टोबर 23, 24 व 25 अशा तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये राज्य आणि राष्ट्र पातळीवरील कलाकार आपले कार्यक्रम सादर करणार आहेत. या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमांना राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री हजेरी लावणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी रोशन यांनी पुढे दिली.
कित्तूर उत्सव कार्यक्रमाचे मुख्य व्यासपीठ, समांतर व्यासपीठ आसन व्यवस्था, पत्रकार कक्ष, मिरवणूक मार्गासह उत्सवासाठी करण्यात आलेल्या इतर तयारीचे निरीक्षण केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सदर उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जाणारा असून नागरिकांनी बहुसंख्येने या उत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन केले.
यावेळी चन्नम्मा यांच्या कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी कित्तूर उत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याच्या अनुषंगाने सर्व ती सिद्धता करण्यात येत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रशिक्षणार्थी आय.ए.एस. अधिकारी दिनेशकुमार विणा यांच्यासह संबंधित अन्य अधिकारी उपस्थित होते.