बेळगाव लाईव्ह ,:पालखी, वाहन व सासनकाठ्यांच्या मिरवणुकीसह नंदीच्या उपस्थितीत बेळगावचा ऐतिहासिक सीमोल्लंघन सोहळा आज सायंकाळी ज्योती कॉलेज मैदानावर हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने अमाप उत्साह आणि भक्तीभावाने पार पडला.
दरवर्षीप्रमाणे बेळगावच्या सीमोल्लंघन सोहळ्याची सुरुवात पारंपारिक पद्धतीने मानाच्या पालख्या आणि सासन काठ्या यांच्या मिरवणुकीने झाली. शहरातील हुतात्मा चौक येथून आज दुपारी उत्साही वातावरणात भक्तीभावाने वाजत गाजत या मिरवणुकीला प्रारंभ झाला.
तत्पूर्वी चव्हाट गल्ली येथील
बेळगावची मानाची पालखी, ससानकाठी व नंदी आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमारास देवघरातून बाहेर पडले. त्यानंतर ही पालखी व सासनकाठी नंदीसह पारंपारिक वाद्याच्या गजरात हुतात्मा चौक मार्गे सीमोल्लंघन मैदानावर जाण्यासाठी रवाना झाले. चव्हाट गल्लीच्या मानाच्या नंदीचे (कटल्या) आगमन झाल्यानंतर त्या नंदीस अग्रभागी ठेवून त्या पाठोपाठ हुतात्मा चौकातून सर्व पालख्या, सासनकाठ्या ज्योती कॉलेज मैदान अर्थात सीमोल्लंघन मैदानाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या.
या मिरवणुकीमध्ये कपिलेश्वर, समादेवी, मातंगी यासह मारुती मंदिराचे वाहन सहभागी झाले होते. जल्लोषी वातावरणात वाजतगाजत निघालेल्या पालख्या व सासन काठ्यांच्या मिरवणुकीने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. शहरातील नागरिक देखील दुपारनंतर सीमोल्लंघन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या कुटुंबीयांसह ज्योती कॉलेज मैदानाकडे जाताना पहावयास मिळत होते. त्यामुळे या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दुपारनंतर विशेष गर्दी दिसून येत होती.
सिमोल्लंघन मैदानाच्या ठिकाणी बेळगावचे वतनदार रणजीत चव्हाण -पाटील घराण्याकडून तलवारीचे शस्त्रपूजन झाले. याप्रसंगी चव्हाण पाटील घराण्यातील सदस्यांसह माजी आमदार ॲड. अनिल बेनके, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर, ॲड. अमर येळूरकर, रमाकांत कोंडुसकर, सुनील जाधव, गणेश दड्डीकर बेळगाव शहर देवस्थान मंडळाचे पदाधिकारी, सदस्यांसह बहुसंख्य शहरवासीय उपस्थित होते. शस्त्र पूजन व नंदीच्या आगमनानंतर सोने लुटण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली.
सोने लुटण्यासाठी ज्योती मैदान परिसरात तुफान गर्दी झाली होती. सीमोल्लंघन कार्यक्रमानंतर सर्वांनी एकमेकांना आपट्याची पाने (सोने) देऊन विजयादशमी दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे अपूर्व उत्साहासह प्रचंड गर्दी असताना देखील पालखी मिरवणूक व सीमोल्लंघनचा मुख्य कार्यक्रम अतिशय शिस्तबद्धरित्या पार पडला.