बेळगाव लाईव्ह :चार महिन्यांनंतर पहिल्यांदाच महापालिकेने शहरात मोकाट फिरणार्या जनावरांना पकडले. गुरुवारी (दि. 17) महापालिकेने 6 मोकाट जनावरांना पकडून श्रीनगर येथील गोशाळेत पाठवले. त्याठिकाणी आता 21 जनावरांना ठेवण्यात आले आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरांचा वावर झाल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. याशिवाय बाजारपेठेतही मोकाट जनावरांमुळे अडथळा येत होता. त्यामुळे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या आदेशानुसार शहरातील मोकाट जनावरांना आज पकडण्यात आले.
कोतवाल गल्ली परिसरात मोकाट फिरणार्या सहा जनावरांना पकडण्यात आले. त्यांना श्रीनगर गोशाळेत पाठवण्यात आले. यावेळी याठिकाणी मोकाट कुत्र्याने चावा घेतल्यामुळे जखमी झालेल्या जनावरालाही पकडून गोशाळेत पाठवण्यात आले. आता या गोशाळेत 21 मोकाट जनावरे आहेत. शहरात जनावरे मोकाट सोडणार्यांवर कारवाई करण्याचा इशारा महापालिकेने दिला आहे. या जनावरांमुळे रहदारीला त्रास होत असून ही कारवाई अशीच सुरू ठेवावी, अशी लोकांतून मागणी होत आहे.
महापालिकेच्या दोन स्थायी समित्यांच्या बैठका शुक्रवारी
महापालिकेच्या दोन स्थायी समिती बैठका शुक्रवारी होणार आहे. तब्बल अडीच महिन्यांनंतर बांधकाम स्थायी समिती आणि अर्थ आणि कर स्थायी समितीची बैठक होणार आहे.
महापालिकेच्या स्थायी समित्यांची जुलै महिन्यात बैठक झाली होती. त्यानंतर मात्र एकही बैठक झाली नाही. सकाळी 11.30 वाजता बांधकाम स्थायी समिती बैठक होणार आहे. या बैठकीच्या विषयपत्रिकेत मागिल इतिवृत्ताचे वाचन यासह 12 विषय आहेत. तर दुपारी 3.30 वाजता बांधकाम स्थायी समितीची बैठक होणार आहे. व्यापारी आस्थापनांचा लिलाव, भूभाडे वसुलीसाठी ठेकेदाराकडून थकीत रक्कम वसूल करणे आदी चार विषय आहेत. कौन्सील सेक्रेटरी म्हणून उदयकुमार काम पाहणार आहेत.