बेळगाव लाईव्ह : अंजनेयनगर येथील संतोष पद्मण्णवर (वय 46) या खासगी सावकाराचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची मुलगी संजना हिने आपल्या वडिलांचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला नसल्याची तक्रार केल्याने आज सदाशिवनगर स्मशानभूमीत दफन करण्यात आलेला मृतदेह न्यायालयाच्या परवानगीनंतर पुन्हा बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बणियांग यांनी दिली.
बुधवार दि. 9 ऑक्टोबर रोजी संतोष यांचा मृत्यू झाला. कुटुंबीयांनी त्यांच्यावर दफनविधीही केला. संतोष यांच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून माळमारुती पोलीस स्थानकात संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद करण्यात आली. संशयास्पद मृत्यू प्रकरणाची नोंद झाल्यानंतर पोलिसांनी पुढील तपास सुरु करत तक्रारीनुसार मृतदेह बाहेर काढून आज शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
संतोष यांच्या मुलीने फिर्याद दिल्यानंतर माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची व त्यांच्या सहकाऱ्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. मुलीने आपल्या आईवरच संशय व्यक्त केला असून त्यामुळे सर्व शक्यता पडताळण्यात येत आहेत.
संतोष दुंडाप्पा पद्मण्णवर (वय 46) हे खासगी सावकारी करीत होते. त्यांना वाहनांचीही आवड होती. वेगवेगळ्या संघटनांच्या कामात ते सक्रिय असायचे. गेल्या बुधवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. मात्र नेमक्या कोणत्या कारणामुळे ते दगावले याचा उलगडा झाला नाही. संतोष पद्मण्णवर यांनी आपल्या मृत्यूनंतर नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली होती.
त्यानुसार खासगी इस्पितळात नेत्रदान करण्यात आले. नेत्रदानाच्या प्रक्रियेनंतर अंत्यविधी उरकण्यात आला असून एकंदर प्रकरणाबद्दल संशय बळावल्याने त्यांच्या मुलीने फिर्याद दिली होती. संतोष यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचा मृत्यू झाला त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज गायब झाल्याचे सांगण्यात येते.
त्यामुळेच याप्रकरणी संशय बळावला आहे. या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेऊन पुरलेला मृतदेह पुन्हा उकरून शवचिकित्सा करण्यात आली आहे. या मृत्यू प्रकरणाने एकच खळबळ माजली असून शवविच्छेदन अहवालानंतरच यामागचे सत्य बाहेर येणार आहे.