बेळगाव लाईव्ह : अगसगे – कडोली भागातून जाणाऱ्या प्रस्तावित रिंगरोड साठी अतिरिक्त भूसंपादन करण्यात येत असल्याचे निदर्शनात आल्याने अगसगे – कडोली येथील शेतकऱ्यांनी आज भूसंपादन अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
अगसगे – कडोली गावात प्रस्तावित रिंगरोडला लागून पार्किंग टर्मिनलसाठी जमीन संपादित करण्यात येत आहे. या भागात अनेक शेतकरी अल्पभूधारक आहेत. मात्र रिंगरोड साठी या शेतकऱ्यांची जमीन आधीच संपादित करण्यात येत असून यात आता पार्किंग टर्मिनलची भर पडली आहे.
सर्व्हे क्रमांक १४९ आणि १६३ मध्ये अशी कोणतीही टर्मिनल योजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे नव्हती. किंवा ताशपद्धतीची कोणतीही नोटीस शेतकऱ्यांना देण्यात आलेली नाही. मात्र पार्किंग टर्मिनलसाठी अतिरिक्त जमिनी संपादित करण्यात येणार असल्याची बाब निदर्शनात आली असून शेतकरी या निर्णयामुळे देशोधडीला लागणार आहे.
रिंगरोड प्रकल्पात रस्ते बांधणीसाठी आमच्या मालकीची बहुतांश जमीन यापूर्वीच संपादित करण्यात आली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता उपजीविकेची जमीन जप्त करण्यात आली आहे.
त्यामुळे उदरनिर्वाहासाठी वापरल्या जाणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन गेल्याने आमची कुटुंबे रस्त्यावर येणार आहेत. त्यामुळे प्रस्तावित टर्मिनल पार्किंगसाठी जमीन संपादित करू नये अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
यावेळी महेंद्र नार्वेकर, नंदू चलवेटकर, वाय. पी. चलवेटकर, इराप्पा चलवेटकर, मल्लप्पा पावले, सातेरी चलवेटकर, वैजू चलवेटकर, युवराज कुट्रे, परशराम नार्वेकर, यल्लाप्पा नार्वेकर आदी उपस्थित होते.