बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहरातील खाजगी मार्केट अर्थात बाजारपेठेमध्ये फुलं, फळ, चिंच, केळी वगैरेंची होणारा होलसेल व्यापार (खरेदी -विक्री) सरकारच्या एपीएमसी बाजारपेठेत केला जावा आणि त्या माध्यमातून कोट्यावधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या व सध्या ओस पडलेल्या एपीएमसी मार्केटचा उत्कर्ष साधावा, अशी मागणी भारतीय कृषक समाजातर्फे एका निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
भारतीय कृषक समाज कर्नाटकचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांच्या नेतृत्वाखाली आज मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करून उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले. बेळगावमध्ये जय किसान भाजी मार्केट हे खाजगी भाजी मार्केट आहे.
खाजगीकरणाचा एक भाग असलेल्या या भाजी मार्केटमुळे सरकारचे एपीएमसी मार्केट ओस पडले आहे. आमचा सरकारला प्रश्नात आहे की तुम्हाला राज्यात आपलं सरकार पाहिजे, केंद्रात पाहिजे तर मग सरकारी संस्था का नकोत. कारण आज सरकारी संस्था खाजगीकरणाच्या नावाखाली उध्वस्त होत आहेत.
या खाजगीकरणामुळे जनतेला विशेष करून शेतकऱ्यांना ज्या सेवा सुविधा सरकारकडून मिळायला हव्यात त्या मिळनाशा झाल्या आहेत. जर बेळगाव एपीएमसी मार्केटला पूर्वीप्रमाणे वैभव प्राप्त झाले तर त्याचा शेतकऱ्यांनाही लाभ होईल. कोट्यावधी रुपये खर्च करून नव्याने बांधण्यात आलेले एपीएमसी मार्केट वापराविना धुळ खात पडून आहे. मात्र सरकारला त्याची काहींही चिंता नाही. येत्या काळात हे असेच सुरू राहिले तर खाजगीकरणामुळे अराजकता माजेल. याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. सरकारी संस्थांचे खाजगीकरण थांबले पाहिजे. शहरातील जय किसान भाजी मार्केट हे संपूर्णपणे बेकायदेशीर आहे.
तेंव्हा त्या ठिकाणी फुल, फळ, चिंच तसेच मिरची वगैरे भाजीपाल्याचा मोठ्या प्रमाणात व्यापार अर्थात खरेदी -विक्री करणाऱ्या शेतकरी आणि व्यापाऱ्यांना एपीएमसी भाजी मार्केट येथे स्थलांतरित करून हे मार्केट पुन्हा भरभराटीस आणावे, अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे.
तसेच त्या अनुषंगाने सरकारने देखील कायद्या दुरुस्ती करून कार्यवाही करावी अशी आमची विनंती आहे, असे शेतकरी नेत्यांनी यावेळी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले. याप्रसंगी भारतीय कृषक समाजाचे सदस्य शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.