बेळगाव लाईव्ह : हुबळी – पुणे दरम्यान सुरु झालेल्या वंदे भारत सेवेमुळे बेळगावकरांच्या आशा पल्लवित झाल्या असून बेंगळुरू – बेळगावसाठी वंदे भारत सुरु करण्याच्या मागणीला यश येणार असल्याचे चित्र दिसत आहे.
पुणे आणि हुबळी दरम्यान नवीन वंदे भारत एक्स्प्रेस सेवेच्या घोषणेनंतर बेंगळुरू-धारवाड वंदे भारत सेवा बेळगावपर्यंत विस्तारित करण्याबाबत चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. बऱ्याच कालावधीपासून हि मागणी होत असूनही याकडे तांत्रिक अडचणींची कारणे देत दुर्लक्ष करण्यात आले होते.
मात्र प्रवाशांच्या वाढत्या मागण्या लक्षात घेत आता बेंगळुरू – बेळगाव मार्गाच्या विस्तारीकरणासाठीही हालचाली सुरु असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
“मी खासदार जगदीश शेट्टर आणि इतर लोकप्रतिनिधींशी वैयक्तिकरित्या या विषयावर चर्चा केली आहे. आम्ही प्रवाशांच्या मागण्यांना प्रतिसाद देत आहोत आणि लवकरच ही सेवा उपलब्ध करून देऊ,” असे सूतोवाच व्ही. सोमन्ना यांनी केले आहे.
मंत्र्यांनी भर दिला की सेवेचा विस्तार करण्याचा निर्णय लोकांच्या गरजा लक्षात घेऊन घेतला जातो आणि हा निर्णय सरकारसाठी प्राधान्यक्रमात आहे. राजकीय दृष्ट्या विचलित होऊन निर्णय घ्या ऐवजी जनतेला लाभदायक सेवा पुरविण्यासाठी निर्णय घेण्यास आमचे प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले.
लोंढा स्थानकाच्या हद्दीत अनेक वळणे असून त्यामुळे गाडीच्या वेगात व्यत्यय येतो असे कारण देत धारवाड ते बेळगाव दरम्यान वंदे भारत रेल्वे सेवा वाढविण्यात आली नाही. ही माहिती समोर येताच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले. बेळगावहून बेंगळुरूला दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. सध्याच्या रेल्वेमध्ये गर्दी होत असल्याने रेल्वे सुविधा वाढवण्याची गरज आहे. जर हुबळी – पुणे वंदे भारत सुरु केली जाऊ शकते तर बेळगाव – बेंगळुरू साठी हि सेवा का पुरविली जाऊ शकत नाही? हुबळी ते पुणे या मार्गावर रेल्वेसेवा सुरु करण्यात आल्याने रेल्वे विभागाने बेंगळुरूसाठी हीच रेल्वे सेवा बेळगावपर्यंत का वाढवली नाही, यावरून प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शिवाय बेळगावच्या नागरिकांमध्ये नाराजी देखील व्यक्त होत आहे. रेल्वे मंत्रालय सीमाभागातील प्रवाशांचे हित पाहत नाही, हुबळी-धारवाडपर्यंत रेल्वे सुविधा मर्यादित ठेवून बेळगाव मधील प्रवाशांकडे दुर्लक्ष केले जात आहे. या समस्येकडे स्थानिक खासदार व आमदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप जनतेतून होत आहे.