बेळगाव लाईव्ह :पुणे येथून बेळगाव मार्गे हुबळीपर्यंतच्या वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचा शुभारंभ येत्या सोमवार दि. 16 सप्टेंबर 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अहमदाबाद येथून व्हर्चुअल पद्धतीने हिरवा बावटा दाखवून केला जाणार आहे, अशी माहिती खासदार इराण्णा कडाडी यांनी दिली.
शहरामध्ये गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. येत्या सोमवारी 16 सप्टेंबर रोजी पुणे -हुबळी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे पुणे येथून सायंकाळी 4:15 वाजता प्रस्थान करून रात्री 9 वाजता बेळगाव रेल्वे स्थानकावर दाखल होईल.
तत्पूर्वी रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी रात्री 8 वाजता सांस्कृतिक कार्यक्रम आणि स्वागत समारंभाचे आयोजन केले जाईल. वंदे भारत एक्सप्रेसच्या स्वागताच्या अनुषंगाने आयोजित या कार्यक्रमाला नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करून वंदे भारत एक्सप्रेसला पुणे ते हुबळी पर्यंतचा आपला प्रवास पूर्ण करण्यासाठी 8 तास 30 मिनिटांचा कालावधी लागणार असल्याची माहिती खासदार कडाडी यांनी दिली.
पुणे येथून सोमवारी 16 सप्टेंबर रोजी वंदे एक्सप्रेस सुरू होणार असली तरी हुबळी येथून बुधवारी 18 सप्टेंबर रोजी या रेल्वेचा प्रवास सुरू होईल. आता सुरुवातीला आठवड्यात बुधवार, शुक्रवार आणि रविवार अशा तीन दिवशी ही रेल्वे हुबळी येथून धावेल. पुढे प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेऊन ही रेल्वे सेवा वाढवण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पुणे -हुबळी वंदे भारत एक्सप्रेस रेल्वेचे वेळापत्रक पुढील प्रमाणे असेल. रेल्वे क्र. 20669 हुबळी येथून पहाटे 5 वाजता प्रस्थान, सकाळी 5:15 वाजता धारवाड, 6:55 वाजता बेळगावमध्ये, 9:15 वाजता मिरजेत, 9:30 वाजता सांगलीमध्ये,
10:35 वाजता सातारा आणि दुपारी 1:30 वाजता पुणे येथे आगमन. त्याचप्रमाणे रेल्वे क्र. 20670 पुण्याहून दुपारी 2:15 वाजता प्रस्थान, सातारा 4:08 वा., सांगली 6:10 वा., मिरजेला 6:45 वा. बेळगावला रात्री 8:35 वा. धारवाडला रात्री 10:20 आणि त्यानंतर हुबळी येथे 10:45 वाजता आगमन.