हिंदू धर्मात अनेक एकापाठोपाठ एक असे अनेक साजरे केले जातात. अलीकडे सोशल मीडियावर वाढलेल्या अनेक गोष्टींमुळे सण – वार साजरे करण्याची पद्धत बदलत चालली आहे. प्रामुख्याने गणेशोत्सव, दसरा आणि दिवाळी या सणांमध्ये मराठा तरुण अधिक व्यस्त होत असलेला दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठा समाजातील तरुणच अधिक या सर्व कामकाजांमध्ये व्यस्त असलेला दिसून येतो. मात्र यादरम्यान होणारे शैक्षणिक, आर्थिक, व्यावसायिक नुकसान मात्र दुर्लक्षित केले जात आहे.
नुकताच सर्वत्र गणेशोत्सव साजरा झाला. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक सार्वजनिक मंडळे, घरगुती गणेशोत्सवासाठी तरुण पिढी व्यस्त झाली. महिनाभर आधीपासूनच ढोल – ताशा, मंडळाची कामे, वर्गणी वसुली यासह अनेक गोष्टींमध्ये मराठी तरुण व्यस्त झाला. मात्र या कालावधीत या तरुणांचे झालेले नुकसान कसे आणि कोण भरून काढणार? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे. सीमाभाग म्हणून आधीच मराठा समाजाच्या तरुणांना डावलण्यात येते. चोहोबाजूंनी शेतजमीन विविध विकासकामांसाठी बळकाविली जात आहे. मग अशातच पुन्हा असे सण वार करण्यात जर मराठा तरुण व्यस्त झाला तर त्याची प्रगती कशी होणार? हा प्रश्न अनुत्तरीतच राहत आहे.
गेल्या १० – १५ दिवसात कार्यकर्ता म्हणून राबणाराही मराठी तरुणच अधिक होता आणि प्रेक्षक म्हणून रस्त्यारस्त्यावर गर्दी करणाराही मराठा तरुणच होता. इतर समाजातील तरुण – तरुणी या सर्व गोष्टी जपत आपल्या करियरकडेही गांभीर्याने लक्ष देतात. पण आपल्या समाजातील तरुण पिढी हि केवळ दिवसरात्र अशा उत्सवांच्या मागे धावत असल्याचे दिसत आहे.
सण – वार – उत्सव या गोष्टी करू नयेत असे नाही. परंतु प्रत्येक गोष्टीची एक विशिष्ट मर्यादा असते. गणेशोत्सवाचे १२ दिवस आणि विसर्जनाचे २ दिवस याचप्रमाणे आगमन सोहळा, आगमन सोहळ्याची तयारी, गणेशोत्सवाची पूर्वतयारी यामध्ये आपले नुकसान किती झाले याचे भान मात्र मराठा समाजातील तरुणांना राहिलेच नाही. देव, धर्म, देश, चालीरीती, परंपरा या सर्व गोष्टी आपल्यासोबत पुढे घेऊन जाणे, जपणे आणि संवर्धन करणे हे महत्त्वाचेच आहे. परंतु हे जपताना आपली प्रगती कुठे खुंटत तर नाही ना? हा प्रश्न देखील स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
आपला समाज कुठे चाललाय, नेमकं कुठं आपल्या समाजाचं चुकतंय? आपल्या समाजातील तरुणांना दिशा दाखविण्यासाठी, मार्गदर्शन करण्यासाठी कोण पुढाकार घेणार? आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी आपण काय केलं पाहिजे? हे असे अनेक प्रश्न मराठी समाजातील तरुणांसह मराठी पुढाऱ्यांनीही स्वतःला विचारणे गरजेचे आहे.
आता गणेशोत्सवापाठोपाठ दसऱ्याची सुरुवात होईल. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी गणेशमूर्तींप्रमाणेच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्याची संस्कृती बेळगावात रुजत आहे. यासाठी आतापासूनच नवरात्रोत्सव मंडळाची लगबग सुरु झाली आहे. गणेशोत्सवाचे १० – १५ दिवस आणि त्यापाठोपाठ नवरात्रोत्सवाचे १० – १२ दिवस असे एकामागोमाग एक दिवस केवळ सण – वार – उत्सव आणि कार्यक्रमांमध्येच व्यस्त राहिले तर मग आपल्या प्रगतीसाठी आपण कधी वेळ काढणार? आणि याचा विचार कधी करणार? असे प्रश्न आता जाणकारातून व्यक्त होत आहेत.