बेळगाव लाईव्ह :शिक्षण खात्यातर्फे आयोजित बेळगाव तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात हलगा येथील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला तालुक्यातील ‘आदर्श शाळा’ हा पुरस्कार प्रदान करून गौरवण्यात आले आहे.
बेळगाव शहरातील गांधी भवन येथे काल शुक्रवारी बेळगाव तालुकास्तरीय शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी आदर्श शिक्षक आणि आदर्श शाळा पुरस्कार वितरित केले गेले. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुक्तीमठ शिवानंद स्वामीजी होते. तसेच प्रमुख पाहुण्या म्हणून महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर उपस्थित होत्या.
यावेळी व्यासपीठावर जिल्हा शिक्षणाधिकारी लीलावती हिरेमठ, डायट प्राचार्य बसवराज नलतवाड, गटशिक्षणाधिकारी एस. पी. दासपण्णावर, बीआरसी प्रमुख एम. एस. मेदार, हलगा सीआरपी एफ. एस. मुल्ला, राज्य हायस्कूल सहशिक्षक संघाचे उपाध्यक्ष रामू गुगवाड आदी हजर होते. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.
सदर कार्यक्रमात मंत्र्यांच्या हस्ते हलगा सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळेला तालुकास्तरीय ‘उत्कृष्ट शाळा’ हा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण कांबळे आणि शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष मोनाप्पा संताजी यांनी स्वीकारला.
याप्रसंगी हलगा शाळेचे सहशिक्षक व्हि. जी. घाटीबांधे, अश्विनी बागेवाडी, एस. बी. सफारे, एस. बी. भोसले, एम. ए. देसाई, आर. एम. घोरपडे, एम. व्ही. चौगुले, शाळा सुधारणा समितीचे सदस्य अनिल शिंदे, आशा संताजी, ज्योती संताजी, सुजाता संताजी, पालक भारती संताजी आदी उपस्थित होते. कार्यक्रमास संपूर्ण बेळगाव तालुक्यातून शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.