बेळगाव लाईव्ह : काँग्रेस रोडवर पहिल्या रेल्वे फाटकानजिक रेल्वेखाली आत्महत्या करण्यास गेलेल्या महिला व दोन मुलांचा जीव बालिका आदर्श विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनीने वाचविला असून तिने केलेल्या या धाडसी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
स्फूर्ती विश्वनाथ सव्वाशेरी असे या विद्यार्थिनीचे नाव असून ती बालिका आदर्श शाळेत इयत्ता नववीमध्ये शिकत आहे. पहिले रेल्वे फाटक पडण्यापासून ते एका मागोमाग एक रेल्वे धावण्यापर्यंत अगदी क्षणाच्याच काळात एक महिला आपल्या दोन मुलांसमवेत रेल्वेरुळावर धावू लागली.
ही बाब स्फूर्तीचा लक्षात येताच तिने आपल्या आजूबाजूला असलेल्या नागरिकांना लक्षात आणून दिली. महिलेची धडपड वेगळ्याच कारणास्तव चालली असल्याचे तिच्या लक्षात येताच आपल्या वडिलांनाही तिने तातडीने ही बाब सांगितली. लोकांची जमवाजमव करून अखेर त्या महिलेला आणि तिच्या दोन मुलांना सुखरूपपणे बाहेर काढले.
ही वेळ आणि तो क्षण इतका विचित्र होता कि या वेळेत सर्वसामान्यपणे कुणाच्याही लक्षात अशी बाब येणार नाही. परंतु आपल्या डोळ्यादेखत काहीतरी चुकीचे होत असल्याचे लक्षात येताच स्फूर्तीने दाखविलेली सजगता आणि धाडसीपणा यामुळे तीन जीव वाचले आहेत.
सदर महिला घरगुती कारणामुळे मानसिक नैराश्यातून आत्महत्येसारख्या निर्णयापर्यंत पोहोचल्याची माहिती याचवेळी उपलब्ध झाली. ही बाब पोलिसांपर्यंत पोहोचली असती तर साहजिकच त्या महिलेवर तक्रार दाखल झाली असती. मात्र घटनास्थळी उपस्थित असलेल्या जागरूक नागरिकांनी महिलेच्या समस्येत आणि तिच्या मानसिकतेत आणखीन अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी त्याचठिकाणी उपस्थित असलेल्या तिच्या नातेवाईकांकडे तिला सुखरूप सुपूर्द केले. यावेळी महिलेच्या नातेवाईकांना या घटनेची संपूर्ण माहिती देऊन पुढील काही दिवस महिलेची मानसिकता जपण्याचा आवर्जून संदेशही देण्यात आला.
आत्महत्येसारखे विचार मनात येणे आणि आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होणे यासाठी अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतका वेळ पुरेसा असतो. मात्र या काळातही एखाद्याने योग्य समुपदेशन केले तर यातून बाहेर पडता येणे शक्य आहे हीच बाब स्फूर्ती सव्वाशेरी या विद्यार्थिनीने दाखविलेल्या धाडसातून सिद्ध होते. स्फूर्तीने उचललेल्या धाडसी पावलांबद्दल तिला रोटरी क्लब ऑफ बेळगाव नॉर्थतर्फे “ब्रेव्हरी ऑवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे.
शिवाय ग्रामीण मतदार संघाच्या आमदारांनीही तिच्या या धाडसी कायाची दखल घेत तिचा सन्मान केला आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणाचा केवळ आपल्या करियरपूरताच विचार न करता त्या शिक्षणाचा, संस्कारांचा योग्य ठिकाणी, योग्य वेळी वापर कसा केला जाऊ शकतो हेच स्फूर्ती सव्वाशेरी या विद्यार्थिनीने अधोरेखित केले आहे.