बेळगाव लाईव्ह : गोकाकच्या महालक्ष्मी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी वेगाने तपासाची सूत्रे हाती घेत अखेर बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी 14 आरोपींच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.
आज बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी उपरोक्त माहिती दिली आहे.
बँकेत झालेल्या घोटाळ्याप्रकरणी बँकेच्या उपाध्यक्षांनी केलेल्या तक्रारीनुसार चौकशी करण्यात आली असून बँकेच्या कर्मचाऱ्यांसह १४ आरोपींवर तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवाय फसवणुकीप्रकरणी ११२ मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.
या घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली असता, एका व्यक्तीने ठेव ठेवून त्यावर दुसऱ्या व्यक्तीच्या नावे कर्ज घेऊन ते परतफेड न करता फसवणूक केली असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. या बँकेचे चारवेळा ऑडिट होऊनही एकदाही हि बाब निदर्शनात आणली नाही.
२०२१ ते २०२४ या कालावधीत हा घोटाळा झाला असून एप्रिल महिन्यात हा घोटाळा उघडकीस आला आहे. यामुळे एकंदर प्रकरणातील सर्व आरोपींची चौकशी करून १४ जणांच्या १३.१७ कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत, अशी माहिती डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी दिली.