बेळगाव लाईव्ह: बेळगाव दक्षिण सब रजिस्ट्रार कार्यालय दक्षिण भागात स्थलांतरित केल्याने अनेकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे यासाठी सदर कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात स्थलांतरित करा असा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.
दक्षिण उपनोंदणी कार्यालय भाडीत्रो इमारतीत असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. तसेच हे कार्यालय शहरापासून सात किलोमीटर अंतरावर असल्याने लोकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सुभाषचंद्रनगर येथील दक्षिण उपनोंदणी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात किंवा उत्तर उपनोंदणी कार्यालयात स्थलांतरित करण्याचा आदेश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बजावला आहे.
बेळगाव शहरासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आवारात एकच उपनोंदणी कार्यालय होते. 20 जुलै 2020 रोजी दक्षिण मतदार संघासाठी उद्यमबाग येथील सुभाषचंद्रनगर येथे दक्षिण उपनोंदणी कार्यालय सुरू करण्यात आले. हे कार्यालय बीएसएनएल च्या खाजगी इमारतीत सुरू आहे. शहरापासून सात किलोमीटर अंतरावर हे कार्यालय असल्याने मालमत्तांची खरेदी आणि विक्री करण्यासाठी जाणार्या लोकांना अनेक प्रकारे त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर या कार्यालयात 2003 नंतरचे दाखले उपलब्ध नाहीत. त्यामुळे 72 गावच्या लोकांना जिल्हाधिकारी कार्यालयात आवारात असलेल्या उत्तर उपनोंदणी कार्यालयात यावे लागते.
दक्षिण उपनोंदणी कार्यालयासाठी प्रतिमहा 79,414 भाडे म्हणून द्यावे लागत होत.े वर्षाकाठी 9 लाख 52 हजार 968 रुपये भाडे द्यावे लागत असल्याने सरकारचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आवारात किंवा उत्तर उपनोंदणी कार्यालयात स्थलांतरित करण्यात यावे, असा आदेश सरकारने 9 जुलै 2024 रोजी जारी केला होता.
या आदेशाची अंमलबजावणी करण्याची सूचना पालकमंत्री सतीश जारकीहोळी यानी जिल्हा प्रशासनाला केली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सदर कार्यालय स्थलांतरित करण्याचा आदेश जारी केला आहे. दक्षिण विभागाचे नोंदणी अधिकारी आनंद बदनिकाई कार्यालय कधीच स्थलांतरित करतात याकडे लक्ष असणार आहे.