बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हा लघुउद्योग संघटना (बीडीएसएसआयए) आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या (बीसीसीआय) सदस्यांनी ईएसआयसी वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंजुनाथ कळसन्नवार यांची नुकतीच भेट घेऊन ईएसआयसी हॉस्पिटल अशोकनगर येथून अधिक योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्याच्या तातडीच्या गरजेवर चर्चा केली.
सध्याची हॉस्पिटलची इमारत असुरक्षित मानली गेली आहे आणि योग्य सुविधांच्या अभावामुळे रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचारी दोघांच्याही दृष्टीने चिंताजनक बनली आहे. अशोकनगर येथे असलेले सध्याचे हॉस्पिटल केवळ शहराच्या मुख्य औद्योगिक केंद्रापासून दूरच नाही तर कमकुवत झालेली हॉस्पिटलची इमारत डॉक्टर, विमाधारक कर्मचारी (आयपी धारक) आणि व्हिजिटर्स अर्थात अभ्यागतांसाठी गंभीर धोका निर्माण करणारी असल्याचे औद्योगिक प्रतिनिधींनी ठळकपणे सांगितले. “इमारत इतकी धोकादायक स्थितीत आहे की ती कोणत्याही क्षणी कोसळू शकते,” असा इशारा देत त्यांनी सरकारला त्वरीत कारवाई करण्याचे आवाहन केले.
बीडीएसएसआयएचे अध्यक्ष धर उप्पिन, बीडीएसएसआयए व बीसीसीआयचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी, सदस्य व्यंकटेश पाटील, बीसीसीआयचे अध्यक्ष संजीव कत्तीशेट्टी, खजिनदार मनोज मत्तीकोप, सदस्य प्रशांत कळ्ळीमनी,बीडीएसएसआयए व बीसीसीआय यांनी ईएसआयसी हॉस्पिटलसाठी उद्यमबाग आणि मच्छे येथे संभाव्य नवीन जागा पाहिल्या असून ज्या औद्योगिक क्षेत्राच्या खूप जवळ आहेत.
हॉस्पिटल पुनर्स्थापनेमुळे जवळपासच्या औद्योगिक वसाहतींमध्ये काम करणाऱ्या हजारो आयपी धारकांना फायदा होईल. तसेच आरोग्यसेवा वाढण्याबरोबर एकूण सुरक्षितता वाढेल. सदस्यांनी या भागात हॉस्पिटलच्या स्थलांतर करण्याच्या महत्त्वावर भर दिला. हे हॉस्पिटल शहराच्या औद्योगिक कामगारांना आवश्यक सोयी आणि आराम देईल, असे त्यांनी नमूद केले.
सदस्यांची मागणी आणि सूचनेचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन ईएसआयसी अधिकाऱ्यांनी दिले आहे. त्यामुळे कर्मचारी आणि वैद्यकीय समुदाय या दोघांनाही चांगल्या आणि सुरक्षित सुविधा मिळतील याची खात्री करून हॉस्पिटल स्थलांतरित करण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा आहे.